नागपूर : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानी केलेल्या आंदोलन नंतर नागपुरात दंगल उसळली. या दंगलीचा सूत्रधार कोण याचा पोलीस शोध घेत होत असतानाच मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष फहीम खान याचे नाव समोर आले होते. मात्र, या दंगलीच्या आणखी एका कथित सूत्रधाराचे नाव समोर आले आहे.

सय्यद अली असे त्याचे नाव असून उत्तरप्रदेशमधील नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येत अटकेत होता. सोमवारी हिंसाचार घडवून आणण्यासाठी नागपुरात काही ठिकाणी बैठकी झाल्या होत्या व त्यात सय्यद सहभागी झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत अधिकृत बोलण्यास नकार दिला आहे.

सोमवारी औरंगजेबाची कबर हटविण्यावरून विहिंप व बजरंग दलाचे आंदोलन झाले. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात तीन ठिकाणी एका गटाच्या बैठका झाल्या. या बैठका यशोधरानगर, भालदारपुरा व गिट्टीखदान परिसरात झाल्या होत्या. त्यातच पूर्ण कट शिजला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका बैठकीत सय्यददेखील सहभागी होता व त्याने एकूण कटाची रुपरेषा ठरविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तो गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याचा शोध सुरू असून तो सध्या फरार आहे.

नागपूर पोलिसांनी कोतवाली गणेशपेठ, तहसील आणि सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून जवळपास शंभरावर दंगलखोरांना अटक केली आहे. या दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खान सध्या पोलीस कोठडीत आहे तर दुसरा सूत्रधार सय्यद अलीचा पोलीस कसून शोध घेत आहे.

सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी ( एमडीपी) चा पदाधिकारी होता. मात्र, त्यानंतर तो राजकारणापासून दूर झाला. २०१९ मध्ये हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांची हत्या झाली होती. सय्यद अलीने तिवारींची जीभ कापणाऱ्याला रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली होती. त्या प्रकरणात ऑक्टोबर २०१९ मध्ये एटीएसने त्याला अटक करत उत्तर प्रदेश पोलिसांना सोपविले होते. २०२४ साली जामीनावर त्याची सुटका झाली. तेव्हापासून ते अलिप्त राहूनच काम करत होता. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू असून पोलीस अधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर मौन साधले आहे. दरम्यान नागपुरच्या हिंसाचाराचा तपास एटीएसकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत गृहमंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.