नागपूर : श्रीमंत पालकांच्या पाल्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देण्यासाठी आरोपी शाहिद शरीफने सक्करदऱ्यातील एका झेरॉक्स सेंटरच्या संचालकाला कटात सामिल केले होते. त्याच्याच कार्यालयातून शेकडो बनावट कागदपत्रे तयार करण्यात आले. सदर पोलिसांनी त्या कार्यालयावर छापा घालून बनावट कागदपत्रे, शासकीय शिक्के, प्रिंटर, स्कॅनर आदी साहित्य जप्त केले. शुभम भुते (३२) रा. हुडकेश्वर असे त्या आरोपी युवकाचे नाव आहे.
आरटीई अंतर्गत शाळा प्रवेश प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. पालकांपासून सुरू झालेले प्रकरण मुख्य सूत्रधार शाहिद शरीफ आणि त्याची व्यवस्थापक रुख्सार शेख ऊर्फ रुपाली धमगायेपर्यंत पोहोचले. आता बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्याचे नाव समोर आले आहेत. या प्रकरणी सदर पोलिसांनी रात्री सक्करदरा येथील शुभम भूतेच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. तसेच त्याच्या घराचीही झडती घेतली. मात्र, घरी काहीही मिळाले नाही. शुभम हा शाहिद शरीफसाठी काम करायचा. शरीफच्या आदेशाने पालकांना तो बनावट कागदपत्रे तयार करून देत होता. त्याने आतापर्यंत बनावट शेकडो उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, भाडे करारनामा, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्रे तयार करून दिले आहेत.
हेही वाचा… पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गावभर फिरला पती…..
या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर शुभमही फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान सदर पोलिसांनी शरीफचे कार्यालय सील केले. तसेच त्याची व्यवस्थापक रुख्सार ऊर्फ रुपाली तसेच प्रशांत हेडाऊ, राजेश बुवाडे या दोन पालकांना अटक केली. आता रुख्सारसह तिघेही कारागृहात आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार शाहिद शरीफ हा आधीपासूनच फरार झाला आहे. सदर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो विदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस त्याचे पारपत्र रद्द करण्याच्या तयारीत आहेत. पोलीस लवकरच त्याच्या मुसक्या आवळतील. शरीफने पालकांना स्वत:च्या कार्यालयात बोलाविण्यासाठी जिल्हा परिषदेतही फलक लावले होते.
हेही वाचा…ताडोबात आता नो रिव्हर्स, नो यू-टर्न; नियम मोडल्यास…
आणखी एका पालकाला अटक
शिक्षण विस्तार अधिकारी तथा पडताळणी समितीचे सदस्य सचिव रमेश हरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी १७ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तक्रारीवरून पोलिसांनी दोन पालकांना अटकही केली. यापूर्वी श्यामशंकर पांडे याला तर मंगळवारी तारेंद्र पवार (चिंचभवन) याला अटक केली. तारेंद्र पवार हा लुपिन फार्मास्युटीकल कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीवर असून त्याने बनावट जात प्रमाणपत्र तयार केले होते. जरीपटक्यातील पालक शरद देवदाणी यांनी सीताबर्डीचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सूचनापत्रावर सोडून दिले असून त्याला गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे चोरमले यांनी सांगितले.