नागपूर : आरटीईअंतर्गत शाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा अद्याप फरार असला तरी सदर पोलिसांनी त्याचा भाऊ राजा शरीफला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासात तो पोलिसांना सहकार्य करीत नाही. याप्रकरणासंदर्भात मला काहीच माहिती नाही, शरीफशी माझा काहीच संबध नाही, असा पाढा तो पोलिसांसमोर वाचतो. मात्र,त्याच्याकडून माहिती काढून घेण्यास पोलीस प्रयत्नशील आहेत.
राजा शरीफ हा आरटीईतून प्रवेश घेण्यास इच्छुक श्रीमंत पालकांचा शोध घेऊन शाहिदसाठी ग्राहक शोधण्याचे काम करीत होता. याच माहितीवरून सदर पोलिसांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. पोलीस पकडणार अशी कुणकुण लागताच तो कारने टीव्ही टॉवरकडून फुटाळाकडे जात असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याला अटक करून बुधवारी न्यायालयात आणले.
हेही वाचा…वर्धा :अमर काळे यांच्या विजयाचे पडद्यामागील ‘हे’ आहेत सूत्रधार
१९ मे रोजी सदर पोलिसांनी गट शिक्षणाधिकारी कवडू दुर्गे यांच्या तक्रारीवरून बनावट कागदपत्रांद्वारे मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देणाऱ्या प्रशांत हेडाऊ आणि राजेश बुवाडेविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. तपासात दोघांनीही आरटीई कार्यकर्ता असल्याची बतावणी करणाऱ्या शाहिद शरीफच्या माध्यमातून मुलांना नामांकित शाळेत प्रवेश मिळविल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली, मात्र शाहिद फरार झाला. पोलिसांनी त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या रुखसार चांद सय्यद उर्फ रुपाली धमगाये हिला अटक केली होती. पोलीस आयुक्तांनी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीच्या तपासात शाहिदसाठी ग्राहक आणण्याचे काम त्याचा लहान भाऊ राजा शरीफ करीत होता, अशी माहिती मिळाली.
हेही वाचा…गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, चार लिपिकांचा सहभाग
आता पोलीस राजाशी संबंधित लोकांवरही फास आवळण्याची तयारी करीत आहेत. पोलिसांना संशय आहे की, राजाचे साथीदारही शाहिदला फरार राहण्यात मदत करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहायक आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात सदर ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे, विजया म्हेत्रे व त्यांच्या पथकाने केली.