नागपूर : राज्यभरातील गुन्हेगारांची माहिती एका ‘क्लिक’वर मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात ‘क्राईम अँड क्रिमिनल ट्रँकिंग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) प्रणालीची अंमलबजावणी होत आहे. या प्रणालीच्या मूल्यमापनात नागपूर ग्रामीण पोलिसांनी राज्यातून तिसरे स्थान पटकावले आहे.
पहिल्या स्थानावर जालना तर दुसऱ्या स्थानावर रायगड पोलिसांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन युगात पोलीस विभागसुद्धा ‘स्मार्ट’ झाला आहे. कुठेही कोणताही गुन्हा किंवा घटना घडली तसेच राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यास त्या गुन्ह्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने ‘सीसीटीएनएस’ प्रणालीवर दिली जाते. ही प्रणाली सध्या देशभरातील पोलीस ठाण्यात कार्यान्वित आहे. गुन्हेगारांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी ही प्रणाली पोलिसांसाठी महत्त्वाची आहे. या प्रणालीअंतर्गत ‘आयसीजीएस’ या पोर्टलला लिंक करण्यात आले आहे. याद्वारे कोणत्या शहरात किती गुन्हे घडले किंवा गुन्हेगारीचे स्वरूप लगेच पोलिसांना कळू शकते.
राज्य पोलीस महासंचालकांच्यावतीने जून महिन्यांचे ‘सीसीटीएनएस’ प्रणालीचे मूल्यमापन करण्यात आले. त्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी चांगली कामगिरी केली असून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या प्रयत्नामुळे हे यश ग्रामीण पोलिसांना मिळाले आहे. प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) ते न्यायालयात आरोपपत्र दाखल होईपर्यंत यावर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते. तसेच आरोपी, गुन्ह्यांचे घटनास्थळ, अटक आरोपी, मुद्देमाल जप्ती आणि गुन्ह्यांची इत्यंभूत माहिती असते. कोणत्याही पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा घडला तर फक्त ४८ तासांच्या आत ‘सीसीटीएनएस’ प्रणालीवर माहिती अपलोड करण्यात येते.