नागपूर : नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षारक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळी झाडण्याच्या आवाजामुळे लगेच सहकारी कर्मचारी आणि पोलीस अधीक्षकांनी धाव घेतली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत एम्स रुग्णालयता दाखल करण्यात असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. विशाल तुमसरे (वय ५०, रा.जयताळा) असे जखमी हवालदाराचे नाव आहे. ही घटना घडताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बोबडे यांनी लगेच घटनास्थाळावर पोहचून घटनेची माहिती घेतली. एखाद्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याचे माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल तुमसरे हे ग्रामीण पोलीस दलात पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांची सध्या पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटी आहे. विशाल हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्रपाळीत कर्तव्यावर हजर झाले. त्यांच्या बंगल्यावर सुरक्षा करण्याची जबाबदारी त्यांची होती. शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास विशालने गार्ड रुममध्ये शासकीय पिस्तूलातून स्वतःच्या हनुवटीतून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती गोळी हनुवटीतून थेट डोक्याच्या दिशने बाहेर गेली. गोळी झाडण्याचा आवाज ऐकू येताच पोलीस अधीक्षकासह एक कर्मचाऱ्याने गार्ड रुमकडे धाव घेतली. विशाल हे रक्ताच्या थारोळ्यात तडफडतांना दिसले. पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच विशाल यांनी एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु असून प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा…नवीन गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीत मदतीसाठी नवीन क्लृप्ती… महारेराकडून नागपूर, पुणे..
आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा प्रयत्न
विशाल तुमसरे यांनी सलग राज्य राखिव पोलीस दलात नोकरी केली आहे. तेथून निवृत्त झाल्यानंतर २०२३ मध्ये ते नागपूर ग्रामीण पोलीस दलात भरती झाले. विशाल यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. पत्नी एका खासगी शाळेत नोकरी करते तर मुलींचे शिक्षण सुरु आहे. विशाल यांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला होता. मात्र, त्यात बराच पैसा बुडल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. कौटुंबिक समस्या आणि पैशाची चणचण या विवंचनेतून विशालने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, विशालच्या आत्महत्येमागे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला त्रास आणि वारंवार अपमानीत करुन बोलणे सहन न झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.