नागपूर : सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षक व पालकांनी कौतूकही केले. दिवसभर कष्ट करायचे व गरीबी किंवा अन्य कारणांमुळे राहून गेलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या रात्रीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उत्तम यश मिळवले. नागपुरातील सरस्वती नाईट स्कूलचा यंदा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सोमवारी निकाल जाहीर झाला. नागपुरातील २०६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. अनेक विद्यार्थ्यांनी ९८ ते ९९ टक्के गुण प्राप्त केले. नागपुरातील धंतोलीतील सरस्वती नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. पण ही शाळा व यातील विद्यार्थी इतर शाळांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी मिळवलेले यशही आगळेवेगळे ठरणारे आहे.
रात्रीच्या शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे आहेत. गौतम गोरखडे हे ६७ वर्षाचे आहेत. गरीबी आणि अन्य कारणांमुळे ते प्राथमिक शिक्षणच घेऊ शकले होते. नंतर त्यांचा शाळेशी संबंध तुटला. पण शिक्षण घेण्याची इच्छा कायम होती. त्यामुळे साठी उलटल्यावर त्यांनी रात्रीच्या शाळेत पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. या वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्णही झाले. आपण परीक्षा द्यावी किंवा नाही याबाबत त्यांच्या मनात शंका होती. शिक्षकांनी ती दूर केली, सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली व उत्तीर्ण झाले, असे शिक्षक विजय गेडाम यांनी सांगितले.
हेही वाचा : विदर्भात ‘सन’ताप ! तापमानाचे नवनवे रेकॉर्ड; नवतपाच्या सुरुवातीपासूनच…
दुसरे विद्यार्थी आहेत ५८ वर्षीय बाबा पंडित. ते आटोचालक आहेत. त्यांचेही शिक्षण मध्येच सुटले होते. त्यानंतर ते शाळेत गेले नाही. मात्र शिक्षणाची इच्छा त्यांच्या मनात होती. रात्रीच्या शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी ती पूर्ण केली. यंदा त्यांनी दहावीची परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्णही झाले. सामान्यपणे शिक्षणाचे वय निघून गेल्यावर अभ्यास आणि तत्सम बाबीत लक्ष लागत नाही. शिवाय कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिवसभर काम करणे आणि रात्रीला शाळेत येणे अवघड काम आहे. अशाही परिस्थितीत वरील ज्येष्ठ नागरिकांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास करून परीक्षा उत्तीरण केली हे अधिक कौतूकास्पद असल्याचे शिक्षक गेडाम म्हणाले.
याच शाळेत शिकणारा मंथन हा १७ वर्षाचा आहे. त्याची आई इ-रिक्षा चालवते. ती मुलांना शाळेत नेण्याचे व आणण्याचे काम करते. आईसोबत मंथनही असतो. मुलांना पाहून त्याच्या मनातही शिक्षणाविषयी गोडी तयार झाली व त्याने रात्रीच्या शाळेत प्रवेश घेतला. तो सुद्धा उत्तीर्ण झाला, असे गेडाम म्हणाले.