नागपूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करुन कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी दिल्याच्या आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्या घरासमोर सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत कोरटकरच्या घराला सुरक्षा पुरवली. पोलीस विभागाच्या या तत्परतेमुळे सामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

काही दिवस पत्रकारितेत काम केलेला प्रशांत कोरटकर बेसा मार्गावरील मनिषनगरात राहतो. आज बुधवारी सकाळी कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा महासंघाचे काही कार्य़कर्ते पोहचले. त्यांनी कोरटकरच्या घरासमोर आंदोलन केले. कोरटकरला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांचे आंदोलन होताच पोलिसांनी लगेच सक्रियता दाखवली. कार्यकर्त्यांची समजूत घातली. त्यामुळे तणाव निवळला. प्रशांत कोरटकर याला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याचा नेहमी गृहमंत्रालयात वावर असतो. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन प्रशांत कोरटकर याने शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली. तसेच मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केलीत.

कोरटकरने केलेल्या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप इंद्रजीत सावंत यांनी ‘सोशल मिडिया’वर टाकून कोरटकरचा खरा चेहरा समोर आणल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता नागपूर पोलिसांनी कोरटकरच्या बेसा मार्गावरील घराला सुरक्षा प्रदान केली आहे. कोरटकरने सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी करण्यापूर्वीच नागपूर पोलिसांनी पोलिसांनी घराला सुरक्षा व्यवस्था पुरविल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरटकरच्या घराला एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस अंमलदार आणि दोन होमगार्ड असा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आवाज ‘मॉर्फ’ केल्याचा दावा कितपत खरा ?

आपला आवाज कुणीतरी ‘मॉर्फ’ करुन धमकी दिल्याचा दावा प्रशांत कोरटकरने केला आहे. राज्यभरात पडसाद उमटताच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका कोरटकरने घेतली आहे. मात्र, पोलिसांनी कोल्हापुरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट आहे व अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे राजकारणदेखील तापले आहे. एकूणच या प्रकारामुळे चर्चेत आलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा मार्ग परिसरातील घराला पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था पुरविली आहे.

Story img Loader