नागपूर : विविध देशांची भाषाशैली, उत्तम पोशाख, ध्वजवाहक व देशांचे नामफलक असे चित्र नागपूर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिरुप जी-२० संमेलनात होते. भारताचे पंतप्रधान, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच युरोपीयन युनियनच्या अध्यक्षांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मन जिंकली.
हेही वाचा >>> दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष साकारणारा नुतन भारत विद्यालयाचा निखिल झलके याने तर संपूर्ण भाषणच कोरियन भाषेत केले
नागपुरात २० ते २१ मार्च दरम्यान होणाऱ्या जी-२० परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० परिषदेच्या निमित्ताने परिषदेच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने अभिरुप जी-२० परिषद आयोजित केली होती. अभिरुप संमेलनात सहभागी विद्यार्थ्यांनी जी-२० मध्ये समाविष्ट देशाच्या प्रमुखांचे पोशाख परिधान केले होते. प्रत्येक देशाची चमू सभागृहात दाखल होताच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमासाठी एकूण २० शाळेतील १४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात शुक्रवारी सकाळी आयोजित या संमेलनास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापती राजकुमार कुसुंबे, सी-20 आयोजन समितीच्या सदस्य डॉ.परिणिता फुके, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपूल जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, नागपूर विद्यापीठाचे प्रा. कडू याशिवाय या उपक्रमासाठी आमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रप्रमुखांच्या पोशाखात विद्यार्थ्यांची भाषणे
विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांच्या भूमिका चोख पार पडल्या. त्यांनी संबंधित राष्ट्राच्या भाषेतून भाषणांची सुरुवात केली. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष साकारणारा नुतन भारत विद्यालयाचा निखिल झलके याने तर संपूर्ण भाषणच कोरियन भाषेत केले. सोमलवारच्या संस्कार राठोडने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षाची, खुबचंद बजाज शाळेचा एंजेल मालेवारने युरोपीयन देशाच्या राष्ट्रप्रमुखाची तर भारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका रेशीमबागच्या आदित्य डुमरेने साकारली संचालन संचेती पब्लिक स्कुलचा दिशांक बजाज आणि श्रृती बागडदेव हिने केली.