नागपूर : शहरातील प्रतिष्ठित अशा सेंट जोसेफ सीबीएसई शाळेमधील गंभीर प्रकार समोर आला आहे. शाळेतील संगीत विषयाच्या शिक्षिकेने चौथ्या वर्गातील ९ वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली आहे. संगीत विषयाच्या शिक्षिकेने मारहाण केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या योगिता खान यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनाही तक्रार पाठवून योग्य कारवाईची मागणी केली आहे. तक्रारकर्त्यानुसार शाळेमध्ये अनेक सुविधांची कमतरता असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून शाळा विद्यार्थ्यांना मारहाण करून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेने पालकांना कुठलीही सूचना न देता संस्कृत विषय परस्पर बंद करून टाकला. अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीची दखल घेत संबंधित शिक्षिकेवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कायदा काय सांगतो?

भारतात बालकांसाठी आणल्या गेलेल्या निःशुल्क आणि अनिवार्य बाल शिक्षण अधिनियम २००९ मध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक छळपासून संरक्षण देण्यात आलेले आहे. तसेच बाल हक्क व संरक्षणानुसार बालकांसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आरटीईच्या कलम ३१ अंतर्गत बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळतो. त्याच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स स्थापन करण्यात आले आहे. यात शाळेतील शिक्षा संपवण्यासंदर्भात दिशानिर्देश आहेत. पण, भारतीय कायदाव्यवस्थेत ‘कॉर्पोरल पनिशमेंट’ची स्पष्ट अशी व्याख्या करण्यात आलेली नाही. आरटीई कायद्याअंतर्गत ‘कॉर्पोरल पनिशमेंटचे’ वर्गीकरण हे शारीरिक-मानसिक छळ आणि भेदभाव यांच्यात करण्यात आले आहे. उदाहरणार्थ – मारणे, लाथ मारणे, खरचटणे, चिमटा काढणे, केस ओढणे, कान ओढणे, चापट मारणे, चावणे, एखाद्या वस्तूचा वापर करून मारणे यांचा समावेश आहे. तर बेंचवर किंवा कोणत्याही ठिकाणी उभे करणे याचा समावेश मानसिक छळात करण्यात आलेला आहे.

हेही वाचा…नागपुरातील लाडकी बहीण मेळाव्यावर आशा सेविकांचा बहिष्कार.. झाले असे की…

शिक्षकांना हेही करता येणार नाही

याशिवाय मुलावर कोणत्याही प्रकारची शाब्दिक टीका करणे, वेगवेगळ्या नावांनी बोलावणे, रागावणे, घाबरवणे, अपमानजनक शब्दांचा वापर करणे किंवा लज्जास्पद वाटण्यास प्रवृत्त करणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. शाळेत विद्यार्थ्याच्या बाबतीत शिक्षकाची वागणूक ही पूर्वाग्रहदूषित असल्यास हा प्रकार भेदभाव श्रेणीमध्ये नोंदवला जाईल. यामध्ये एखाद्या जातीविरुद्ध, लिंग, व्यवसाय, २५ टक्के आरक्षणाअंतर्गत प्रवेश, वंचित घटकांशी संबंधित असल्याच्या आधारावर पक्षपातीपणा केल्यास हा भेदभाव मानला जातो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur school teacher accused of brutal beating of 9 year old student complaints filed with education authorities dag 87 psg