नागपूर : शाळेतून मिळालेला एक कागद हातात नाचवत निर्वाणी आईकडे आली. सहलीला जाण्यासाठी पालकाचे परवानगी पत्र असल्याचे सांगून आईला सही मागायला लागली. मात्र, आईने बाबाकडे बोट दाखवले. ‘बाबा… मला सहलीला जायचे आहे… पटकन सही करा’ असा हट्ट धरला. मी सहलीसाठी चक्क नकार दिला. त्यामुळे मुलीने दोन दिवस अबोला धरला. तिचा अबोला सहन न झाल्याने शेवटी तिला परवानगी दिली. तेथेच चुकले, जर मी अबोला सहन केला असता तर माझी मुलगी जिवंत असती, अशी खंत मृत मुलीचे वडील शिलानंद बागडे यांनी त्यांच्या घरी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
शंकरनगरातील सरस्वती शाळा प्रशासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल वर्धा जिल्ह्यातील बोरधरण-वाघविला येथे नेण्याचे ठरविले. त्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आली. सहलीला जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना सहलीसाठी लागणारे शुल्क भरण्यास सांगितले. तसेच सहलीसाठी जाण्यासाठी पालकांची परवानगी असल्याच्या पत्रावर सही आणण्यास सांगितले होते. सर्व विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्रही देण्यात आले. १५ नोव्हेंबरला ठरलेल्या या नियोजनानुसार निर्वाणीने पत्र घरी आणले. तिने सहलीला जाण्याचे नियोजन असल्याचे आईला सांगितले आणि परवानगी पत्रावर सही मागितली. मात्र, तिच्या आईने नकार दिला आणि वडिलांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे निर्वाणीने वडिलांना सहलीला जाण्यासाठी पैसे आणि परवानगी पत्रावर सही मागितली. मात्र, वडिलांनी सहलीस जाण्यास आणि परवानगी पत्रावरही सही करण्यास नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या निर्वाणीने वडिलाशी अबोला धरला. तिची घरातील वागणूक बदलली. दोन दिवसांपासून मुलगी बोलत नसल्यामुळे वडिलाचे हृदय पाझरले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून तिला होकार दिला. जर मुलीचा अबोला सहन केला असता आणि परवानगी दिली नसती तर आजची स्थिती वेगळी असती. निर्वाणीचा जीव वाचला असता, अशी भावना तिचे वडील शिलानंद बागडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – एमपीएससीने दिली परीक्षा रखडण्याची कारणे, म्हणे मराठा आरक्षण…
बहिणीच्या मृत्यूमुळे भाऊ एकाकी
निर्वाणीचा भाऊ आयूष हा सरस्वती शाळेत सातव्या वर्गात शिकतो. तो नेहमी बहिणीसोबतच मेट्रोने शाळेत ये-जा करीत होता. आता निर्वाणीच्या मृत्यूनंतर आयूष एकाकी पडला आहे. वडील नोकरीवर तर आई गृहिणी असल्यामुळे आयूषला शाळेत कोण घेऊन जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता आयूषही सरस्वती विद्यालय सोडणार असून त्याला घराजवळील शाळेत दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली.
३० विद्यार्थ्यांवर अद्यापही उपचार सुरु
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सहा खासगी बसेसने ३५० वर विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात होते. देवळी-पेंढरी घाटातील वळणावर भरधाव बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली आणि शिक्षकांसह ५२ विद्यार्थी जखमी झाले. या अपघातात निर्वाणी शिलानंद बागडे ही ठार झाली. अपघातात ४८ विद्यार्थी जखमी झाले होते. दोन दिवसांनंतर ३० विद्यार्थ्यांवर अद्यापही उपचार सुरु असून एका शिक्षिकेसह आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा – तरुणांना रोजगाराची मोठी संधी; लिपीक, टंकलेखक, शिपाई पदाची…
मदत करणाऱ्यांचा पोलिसांनी केला सत्कार
पेंढरीजवळ बसचा अपघात झाल्यानंतर निलेश गवारे, अनिल घवघवे या युवकांनी स्वयंस्फूर्तीने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना बसमधून काढण्यासाठी मदत केली. दोघांनीही बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात पोहचविण्यासाठी पोलिसांना मदत केली. त्यामुळे हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बोबडे यांनी दोन्ही युवकांचा पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करीत प्रोत्साहन दिले.