नागपूर : मध्य नागपूर मतदारसंघात यंदा भाजप, काँग्रेस आणि हलबा समाजाने उभा केलेल्या रमेश पुणेकर यांच्यात तिरंगी लढत आहे. प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवार शुक्रवारी येथून भाजपने तिकीट नाकारलेले विद्यमान आमदार विकास कुंभारेंच्या कार्यालयात पोहचले. येथे विकास कुंभारे यांनी बंटी शेळके यांना आशीर्वाद दिला. याबाबत आपण आणखी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य नागपूर मतदार संघात यंदा खूपच चुरशीची लढत आहे. भाजपने येथून तीन वेळा आमदार राहिलेल्या विकास कुंभारे यांच्या एवजी येथून विधान परिषद सदस्य प्रवीण दटकेंना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून बंटी शेळके यांना तर हलबा समाजाकडून अपक्ष म्हणून रमेश पुनेकर रिंगणात आहेत.

हेही वाचा…सर्वात कमी उंचीची उमेदवार… उंची जेमतेम ३ फुट ४ इंच, मात्र तब्बल सात निवडणुका…

भाजप- काँग्रेस या प्रमुख पक्षांनी हलबा समाजाला उमेदवारी नकारल्याने संतापलेल्या समाजाकडून दहा अपक्ष हलबा समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास लावून पुनेकर यांना पाठिंबा दिला. तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून मध्य नागपूरात रोज नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळके नेहमीच आगळ्या- वेगळ्या प्रचारामुळे चर्चेत आहे. त्यांनी शुक्रवारी थेट भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचे आशीर्वाद घेतले.

बंटी शेळकेंनी यापूर्वी प्रचारादरम्यान ११ नोव्हेंबरला भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचार कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची घेतलेली गळाभेट, १२ नोव्हेंबरला मध्य नागपुरातील एका भागात डासांचा प्रकोप वाढल्यावर प्रचार सोडून तेथे केलेली फवारणी, १४ नोव्हेंबरला रेशिमबाग परिसरात प्रचारादरम्यान सायकल रिक्षा चालवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आता बंटी शेळके गोळीबाग चौक परिसरात प्रचार करत होते. या दरम्यान ते विद्यमान भाजप उमेदवार विकास कुंभारे यांच्या कार्यालयात गेले. येथील भाजप कार्यकर्त्यांची गळाभेट घेत ते दुसऱ्या कार्यालयात बसलेल्या विकास कुंभारेंना भेटले. त्यांनी कुंभारे यांचा आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते पुढे प्रचारासाठी रवाना झाले. विकास कुंभारे यांनीही प्रेमाने बंटी शेळकेंच्या डोक्यावरून हात फिरवला. मागील विधानसभा निवडणूकीत विकास कुंभारे यांनी तीन हजार मतांनी बंटी शेळके यांचा पराभव केला होता, हे विशेष. हा व्हिडीओ बंटी शेळकेंनी आपल्या समाजमाध्यमावर प्रसारितही केला. त्यावर बंटी शेळके यांनी एक संदेशही लिहिला.

हेही वाचा…५२ वसतिगृहात तब्बल ५,२०० ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा…विद्यार्थी म्हणाले, फडणवीसांनी…

लिहलेला संदेश…

बंटी शेळके यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करीत त्यावर संदेश लिहिला. “माझे मार्गदर्शक आमदार विकास कुंभारे यांचा आज आशिर्वाद घेतला. निवडणुकीच्या धावपळीतही सर्वांशी भेटण्याचा ठाम निर्धार केला आहे. विकास कुंभारे यांची लोकप्रियता माझ्यापेक्षा ३ हजार मतांनी अधिक होती. त्यामुळे मी त्यांना नेहमीच एक लोकप्रिय आमदार मानत आलो आहे. कुंभारे यांनी पाठीवर शाबासकी देत माझा हौसला वाढवला. त्यांच्या आशिर्वादाने निश्चितच आत्मविश्वास बळावला आहे.”

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur sitting mla vikas kumbhar blessed bunty shelke in bjp office mnb 82 sud 02