नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात खून, बलात्कार, विनयभंग, घरफोडी, चोरी, दरोडा आणि हत्येच्या प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यातच जिल्ह्यात १२ हत्याकांड घडले आहेत. हत्याकांडाची मालिका थांबता थांबत नसल्याने उपराजधानी पुन्हा क्राईम सिटी बनण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत. त्या बळावर गुन्हेगारांच्या टोळ्या, भूखंड माफिया, वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपुरात येताच गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. अनेक गुन्हेगारांना शहरातून पळून जाण्यास भाग पाडले होते. काही कुख्यात गुन्हेगार अजूनही कारागृहात आहेत. मात्र, अमितेश कुमार यांचा जवळपास तीन वर्षांचा कालावधी नागपुरात गेल्यामुळे गुन्हेगारांनाही पोलिसांच्या कामाची पद्धत समजल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या नाक्कावर टिच्चून गुन्हेगार आणि माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. पोलीस आयुक्तांना येत्या महापालिका निवडणुकीपर्यंत कोणताही धोका नसल्याचे लक्षात आल्यामुळे सर्व काही शांततेत सुरू आहे. पोलीस आयुक्तांना पूर्वीप्रमाणे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश कायम ठेवता न आल्याने शहरात गुंडगिरी आणि गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – अधिकाऱ्यांना तंबी देत गडकरी म्हणाले, “आता पाऊस आला की मीच रस्त्यावर..”

पिस्तूल वापरणाऱ्यांची संख्या वाढतेय

शहरात पिस्तूल वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्याकांडात पिस्तुलाचा उपयोग वाढला आहे. पूर्वी वर्षभरात एक किंवा दोन घटनांत पिस्तुलाचा वापर झाल्याचे दिसत होते. मात्र, आता लहानसहान गुन्हेगारांकडे पिस्तूल आढळून येत आहे. गुन्हे शाखेचे पथक केवळ वसुलीवर भर देत असल्यामुळे गुन्हेगारांचे फावत असल्याची चर्चा आहे.

वाहतूक वाऱ्यावर

शहरातील ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनचालक सर्रास वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवत आहेत. सध्या शहरातील वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर आहे.

हेही वाचा – ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’: युवकांच्या नवीन कल्पनांना उभारी देणारी स्पर्धा

गेल्या वर्षीच्या तुलनेत उपराजधानीत गुन्हेगारी कमी झाली आहे. प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीए आणि मकोकाच्या कारवायांमध्ये नागपूर पोलीस पहिल्या स्थानावर आहे. टोळीयुद्ध, माफियांवर नियंत्रण मिळवले आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur smart city or crime city 12 murders have taken place in the district in the last one and a half months adk 83 ssb