नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करांवर पोलिसांनी ‘वॉच’ ठेवला आहे. पुणे-मुंबईवरुन येणाऱ्या प्रत्येक खासगी बसची तपासणी करण्यासाठी विशेष ‘स्निफर डॉग’ तैनात करण्यात आले आहे. डॉग पथकाकडून बसेसची रोज तपासणी करण्यात येत आहे.
शहरात अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी खासगी बस आणि रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. ही बाब पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या निदर्शनास आली होती. काही महिन्यांपासून पुणे आणि मुंबई शहरातून नागपुरात अंमली पदार्थ येत आहेत. अनेक तस्कर ड्रग्स आणि गांजा आणण्यासाठी खासगी बसमधील पार्सल किंवा रेल्वेतून आणतात. मात्र, अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीवर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्तांनी विशेष ‘स्निफर डॉग’ तैनात केले आहे. परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांच्या नेतृत्वात ‘स्निफर डॉग’ पथकाडून खासगी बसेसची तपासणी सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा – लोकजागर : साटेलोट्यांचे ‘शिलेदार’!
खासगी बसचे मुख्य केंद्र असलेल्या गणेशपेठ परिसरात बसेसची तपासणी करण्यासाठी ‘स्निफर डॉग’ पथक तैनात केले आहे. बुधवारी या पथकाच्या मदतीने १२ खासगी बसेसची कसून तपासणी करण्यात आली. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी उपक्रमाच्या अनुषंगाने ही कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
शहरातून पावने चार कोटींचे ड्रग्स जप्त
गेल्या १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागपूर पोलिसांनी पावणेचार कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत शहरात १९७ गुन्हे दाखल करण्यात आले असून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ११४ जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये गांजा, मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा प्रमाण सर्वाधिक आहे. नागपूर शहर ‘अंमली पदार्थमुक्त’ करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून पोलीस अंमली पदार्थविरोधी मोहीम यापुढेही कायम ठेवणार आहेत. विविध जनजागृती कार्यक्रम आणि ‘ऑपरेशन थंडर’ हे अभियानही सुरु ठेवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा – ठरलं! राहुल गांधी निवडणुकीचे रणशिंग नागपुरातून फुंकणार
अंमली पदार्थ – गुन्हे – जप्त पदार्थ किंमत
गांजा – ५८ – २८५ किलो – ५३.४५ लाख रुपये
एमडी – ३८ – २.९१ किलो – २ कोटी ९४ लाख रुपये
इतर – १०१ – १३१ किलो – १०.५४ लाख रुपये
एकूण – १९७ – ४१९.२८ किलो – ३ कोटी ६० लाख रुपये