Nagpur South West Assembly Election 2024 :नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राज्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून याकडे केवळ नागपूरकरांचंच नाही, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी म्हणजे २००८ साली झाली. त्यानंतर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपदही सांभाळलं आहे.
हेही वाचा – Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?
२०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल पाटील यांना उमेदवारी दिली होती. याशिवाय बसपाने डॉ. राजेंद्र पडोले, शिवसेनेने पंजू टोटवानी, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप पंचकुले यांना रिंगणात उतरवले होते. यापैकी देवेंद्र फडणवीस यांना ५९.२१ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना एकूण २८.५७ टक्के मते मिळाली होती. याशिवाय बसपाच्या राजेंद्र पडोले यांना ८.६० टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप पंचकुले यांना ०.५३ टक्के मते मिळाली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचं झाल्यास, काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशीष देशमुख यांना रिंगणात उतरवले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने रवींद्र शेंडे, बसपाने विवेक हडके, आपने अमोल हडके यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना ५६.८६ टक्के, तर आशीष देशमुख यांना ३१.१८ टक्के मते मिळाली होती. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ४.५९ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना विजय मिळाला असला तरी त्यांची मतं जवळपास दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं बघायला मिळालं होतं.
या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००९ पासून सलग विजय मिळवला आहे. मात्र, त्यांच्या मतांमध्ये सातत्याने घट झाली आहे, त्यामुळे २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच मतदारसंघात संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या मतांमध्ये घट झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला ६५ हजार मते मिळाली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नितीन गडकरी यांना केवळ ३३ हजार मते मिळाली.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. प्रफुल्ल गुडधे नगरसेवक आहेत. एक सक्रिय नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे. या मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच २००९ पासून काँग्रेसला एकदाही इथे विजय मिळवता आलेला नाही.
हेही वाचा – जतमधील बंडखोरी टाळण्याचे चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न निष्फळ
याशिवाय बहुजन समाज पार्टीचे सुरेंद्र श्रावण डोंगरे, अखिल भारतीय परिवार पार्टीच्या उषा मारोतराव ढोक, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे ओपूल रामदास तामगाडगे, भिमसेना पक्षाचे पंकज माणिकराव शंभरकर, बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टीचे मारोती सीताराम वानखेडे, वंचित बहुजन आघाडी विनय भांगे, यांच्यासह काही अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा इथे चुरशीची लढत होईल की देवेंद्र फडणवीस एकतर्फी विजय मिळवतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.