नागपूर : लोकशाही जेवढी महत्त्वाची तेवढीच लोकशाहीसाठी चालवण्यात येणारी निवडणूक प्रक्रिया देखील महत्त्वाची. मात्र, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना याची जाण नसेल, तर मात्र लोकशाहीची यंत्रणा चालणार कशी हा प्रश्न पडतो. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी नागपूर शहरात पार पडले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये या प्रक्रियेबद्दल कमालीची उत्सुकता होती. मात्र, शहरातील एका केंद्रातील कर्मचाऱ्याने निवडणूक नियमांनाच उडवत लावले. हे पाहून नवमतदाराची उत्सुकताच मावळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर शहरात वर्षभरापूर्वी स्थायिक झाल्यानंतर पहिले मतदान येथेच करण्याची संधी स्वयम चव्हाण या तरुणाला मिळाली. त्यामुळे उत्साहातच तो खामला परिसरात पी एम कॉन्व्हेंट येथे पोहोचला. लोकशाहीची यंत्रणा कशी चालते हे त्याने पहिल्यांदाच पाहिले. मात्र, जे ऐकले होते, त्यापेक्षा वेगळे पाहून त्याचा भ्रमनिरास झाला. बोटाला शाई लावल्याशिवाय मतदाराला मतदान यंत्राकडे पाठवले जात नाही. पण, या केंद्रावर बोटावर शाई लावणाऱ्या कर्मचाऱ्याने ‘आधी मतदान कर, मग शाई लावतो’ असे सांगितले. स्वयम मतदान यंत्राकडे गेला तर ते बंद होते. थोड्याचवेळात ते सुरू झाले आणि मग मतदान करुन तो परत बोटाला शाई लावण्यासाठी त्या कर्मचाऱ्याकडे आला. त्यावेळी ‘तू मतदान केले आहेस ना, मग कशाला शाई हवी’ असे म्हणून त्याला परत पाठवले.

हेही वाचा – ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….

हेही वाचा – मतदानानंतर सट्टा बाजार तेजीत, भंडारा-गोंदियात उमेदवारांना किती मिळतोय भाव, जाणून घ्या….

बाहेर निघाल्यावर त्याने केंद्रावरच्या एका पोलीस अधिकाऱ्याला ही बाब सांगितली. तो अधिकारी परत त्याला आत घेऊन गेला. त्याने त्या कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली, तेव्हा कुठे त्याने बोटाला शाई लावली. त्यामुळे हा प्रकार बोगस मतदानाला बळ देणारा नाही का? अशा प्रकारांमुळे नवमतदार मतदानासाठी उत्साह दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur staff at the polling station says it why does a finger need ink rgc 76 ssb