नागपूर : दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या महाल परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.

महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद करण्यात आले. या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील नागरिकांची गर्दी पोलिसांनी पांगवली. त्यामुळे अनेकांनी पोलिसांवरही रोष व्यक्त करीत पोलिसांविरुद्ध निदर्शने केली. मात्र, पोलिसांनी लगेच क्युआरटी जवानांच्या मदतीने गर्दी पांगवली.

महाल चौकात जाळपोळ

तणाव वाढत असल्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा महाल चौकात पोहचला. तोपर्यंत दोन्ही गटातील व्यक्तींनी रस्त्यावर जाळपोळ केली. रस्त्यावर टायर आणि काही लाकडे जाळून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जाळपोळ झाल्यामुळे सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पाण्याचा मारा करीत आग विझवली. यादरम्यान काही युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून गर्दीला पांग‌विण्याचा प्रयत्न केला.

वाहनांच्या काचा फोडल्या

काही असामाजिक तत्वांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करीत रस्त्यावरी वाहनांची तोडफोड केली. ई रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उभ्या दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली. सर्वाधिक ई रिक्षाचे नुकसान करण्यात आले. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त,सहआयुक्तांसह सर्वच अधिकारी महालमध्ये दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळ‌विण्याचा प्रयत्न करीत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन

नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नागपूरकरांनी शांतता बाळगावी – गडकरी

महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे. नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाही. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेल. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.