|| ज्योती तिरपुडे

पीएच.डी. कक्षाच्या भोंगळ कारभाराचा प्राध्यापक, विद्यार्थ्यांला फटका

पीएच.डी. कक्षाच्या भोंगळ कारभाराचा फटका मौखिक परीक्षेसाठी आलेल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांलाही बसला. पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेसाठी परीक्षकाने तारीख दिली. मात्र, विद्यापीठाने परीक्षाच घेतली नाही. संबंधित प्राध्यापक मागील आठवडय़ात मौखिक परीक्षा घेण्यास आले. मात्र त्यांना ती न घेताच परतावे लागले. त्यावर नाराज होऊन त्यांनी एक तक्रार प्र-कुलगुरूंना दिली. मात्र, अशी तक्रारच प्राप्त न झाल्याचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

पीएच.डी.ची पेट देऊन, नोंदणी करून आणि संशोधन पद्धती पूर्ण करून विद्यार्थी पीएच.डी. करतात. मात्र, त्यांची मौखिक परीक्षा घेणाऱ्या प्राध्यापकांकडे दुर्लक्ष करून विद्यापीठ विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्याची भावना या क्षेत्राशी संबंधित प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे. साधारणत: विद्यार्थ्यांचे प्रबंध परीक्षकांकडे तपासायला पाठवले जातात. त्यात सुधारणेस वाव असल्यास परीक्षक तशा सूचना करून विद्यापीठाकडे तो प्रबंध पाठवतात. त्यानंतर मौखिक परीक्षा होते आणि विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली जाते, अशी पद्धत आहे. मंगला खुणे या विद्यार्थिनीच्या पीएच.डी. मौखिक परीक्षेसाठी परीक्षकाने गेल्या आठवडय़ात १७ व १८ जानेवारीची वेळ दिली. त्यासंबंधी विद्यापीठाच्या पीएच.डी. कक्षाने विद्यापीठाच्या मराठी विभागाला, संबंधित विद्यार्थी आणि मार्गदर्शकाला कळवले नाही. त्यामुळे  परीक्षक म्हणून आलेल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांना मौखिक परीक्षा न घेताच परतावे लागले. यासंदर्भातील तक्रार त्यांनी प्रकुलगुरूंकडे केली. मात्र, ती मिळालीच नाही, असे  प्र-कुलगुरूंनी सांगितले. तसेच पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनीही विद्यापीठाच्या पीएच.डी. कक्षाने मौखिक परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातील  पत्र विभागाला  न मिळाल्याने परीक्षा आयोजित केली नाही, असे सांगितले.

मौखिक परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा येणे शक्य नसते. त्यामुळे काम काढून स्वखर्चाने मी नागपूर विद्यापीठात आलो. मात्र, या ठिकाणी बरीच असहिष्णू वृत्ती जाणवली. संबंधित विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षेची माहिती मराठी विभागाला नव्हती. परीक्षा न झाल्याने तसे पत्र विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंना दिले. त्याची पोहोच पावती मिळाली आहे.    – डॉ. नंदकुमार मोरे, सहयोगी प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</strong>

नियमाचे उल्लंघन

विद्यापीठात मौखिक (व्हायवा) परीक्षेबाबत नियम आहे. मात्र, विद्यापीठाने करावयाची प्रक्रिया प्रत्यक्षात विद्यार्थी परस्पर करीत असतात. त्यासाठी त्यांना विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागातील काही लोक मदत करतात. परीक्षकांची नावे मिळवून विद्यार्थीच त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि प्रवासाची सोयही विद्यार्थी करीत असल्याची अनेक प्रकरणे आहेत. मात्र, नियमानुसार येणाऱ्या प्राध्यापकांची सोय करण्यास विद्यापीठही इच्छुक नसल्याचे उदाहरणावरून स्पष्ट होते.

Story img Loader