नागपूर: चीनमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) संशयित रुग्ण नागपुरात आढळताच महापालिकेचा आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. महापालिकेकडून एचएमआयएस सर्वेक्षण शहरात सुरू करण्यात आले असून महापालिकेकडून याबाबत अनेक महत्वाची माहिती दिली गेली.
महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. एचएमपीव्ही अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि या पार्श्वभूमीवर मनपा कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करण्यात येत असून परिस्थितीवर बारीक लक्ष देण्यात येत आहे.
हेही वाचा – ‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले, नागपूर शहरातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांनी सर्दी- खोकला अर्थात आय. एल. आय. (कोविड १९, इंफ्लुएन्झा- ए, एच१ एन १, एच ३ एन २, एच ५ एन १, एचएमपीव्ही) रुग्णांबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला नियमित देणे आवश्यक आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक ९१७५४१४३५५ आणि महापालिकेचा ईमेल उपलब्ध आहे. त्यात कार्यालयीन वेळेत माहिती देण्याचे आवाहन डॉ. सेलोकर यांनी शहरातील सगळ्याच रुग्णालयांना केले.
नागपुरात दोन संशयित रुग्ण
नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एचएमपीव्ही रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून सध्या दोन संशयीत रूग्ण आढळले आहे. त्यात एका सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. दोघांना ताप, सर्दी, खोकला अशी सर्वसामान्य लक्षणे होती. दोघांचे उपचार बाह्यरुग्ण स्वरूपात झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नसून दोघेही बरे झाले. महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले असले तरी अद्याप कुठेही आय. एल. आय. रुग्णाचे क्लस्टर आढळले नाही. नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून श्वसनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी खबरदारी घेत आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
हेही वाचा – आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?
या रुग्णालयांमध्ये खाटा आरक्षित
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय येथे प्रत्येकी १० खाटा अशा एकूण ३० खाटा सध्या शहरात एचएमपीव्ही रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिली गेली. या ठिकाणी आवश्यकतेनुसार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असून नागरिकांनी न घाबरता जवळच्या महापालिका दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन डॉ. दीपक सेलोकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.