नागपूर : गुन्हेगारी विश्वातील संतोष आंबेकर टोळी, राजू भद्रे टोळी, रणजित सफेलकर टोळी, शेखू टोळी, इप्पा टोळी, माया टोळी, गिजऱ्या टोळी अशा कुख्यात टोळ्या शहरातून नामशेष झाल्या. परंतु, आता नव्याने स्वप्निलच्या ‘बिट्स गँग’ने तोंड वर काढले आहे. स्वप्निलने क्रिकेट सट्टेबाजीच्या विश्वातही पाय रोवले असून नागपुरातील मोठा क्रिकेट बुकी अशी ओळख त्याने निर्माण केली आहे. त्याच्या डोक्यावर सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा हात असल्यामुळे त्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वप्निल हा पूर्वी छोटा गुंड होता. त्याने पाच ते सहा मित्रांना सोबत घेऊन टोळी तयार केली. त्यांच्याकडून तो लुटमार, चोरी, घरफोडी, चोरीचे सोने विकत घेणे, लुबाडणूक करून घेत होता. तो काही दिवस पोलिसांचा खबरीही होता.

हेही वाचा…नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी

अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांसाठी पैसे वसूल करीत होता. त्यातून त्याची दारू, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीशी ओळख झाली. त्यातून पैसा आला. त्याची टोळी ‘बिट्स गँग’ नावाने ओळखली जाऊ लागली. घर खाली करून देणे, खंडणी मागणे, धमकावणे, भूखंडावर बळजबरीने ताबा घेणे आदी कृत्यात सहभाग वाढू लागला. त्यातून स्वप्निलचा गुन्हेगारी विश्वात दबदबा वाढला. या दरम्यान स्वप्निलवर एका राजकीय नेत्याची नजर गेली. त्याने स्वप्निलला पोलिसांपासून संरक्षण मिळवून दिले. तेव्हापासून एक साधा गुंड ‘छोटा डॉन’ झाला.

थेट पोलिसांशी संपर्क साधा

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गुन्हेगारी प्रवृत्ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही गुन्हेगाराला आम्ही सोडणार नाही. सामान्य नागरिकांना त्रास असल्यास त्यांनी पोलिसांशी थेट संपर्क साधावा. डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त.

डान्सबारमध्ये पैशांची उधळण

‘बिट्स गँग’ची अल्पकाळातच आर्थिक भरभराट झाली. राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे स्वप्निलची हिमंत वाढत गेली. तो नेहमी गोवा-मुंबईतील डान्सबारमध्ये जातो. तेथे एका रात्रीत ५ ते ६ लाख रुपये बारगर्लवर उडवतो, अशी माहिती आहे. निवडणुकीपूर्वी त्याला पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात संशयित म्हणून बोलावण्यात आले होते. त्याने तेथे हजेरीही लावली होती. परंतु, राजकीय दबावामुळे पोलिसांनी त्याला सोडले, अशी सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा…महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये

गुन्हेगारीतील पैसा नेत्याच्या प्रसिद्धीसाठी

मुंबईनंतर नागपूर हे सट्टेबाजीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे कोट्यवधींची उलाढाल होत असल्यामुळे स्वप्निलने स्वत:चे ‘आयडी बुक’ घेतले. नागपूरच नव्हे तर विदर्भात त्याच्या माध्यमातून सट्टे लावले जातात. यातील पैसे वसूल करण्यासाठी त्याने राहुल आणि बॉबीला सोबत घेतले. अनेक ठिकाणी जुगार अड्डेही सुरू केले. यातून मिळवलेला पैसा त्याने त्याला संरक्षण देणाऱ्या नेत्याच्या प्रसिद्धीसाठी वापरला, अशी चर्चा आहे.

संग्राम बार हत्याकांडात पहिल्यांदा नाव पुढे

संग्राम बारमध्ये झालेल्या हत्याकांडात पहिल्यांदा स्वप्निलचे नाव पुढे आले होते. त्याचा साथीदार राहुलने केलेल्या अन्य तीन वेगवेगळ्या खुनाच्या घटनेतही त्याचा सहभाग होता. कामठीतील युवा वाळू तस्कराने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणातही स्वप्निलचे नाव चर्चेत होते. वाळू तस्कर सट्ट्यात पैसे हरला होता. त्या पैशांच्या वसुलीची जबाबदारी स्वप्निलकडे होती, हे येथे उल्लेखनीय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur swapnils bits gang emerges as otorious gangs vanish from the city adk 83 sud 02