नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आज सोमवारची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली. ताडोबातील दोन वाघांमध्ये सकाळी सकाळी भांडण झाले आणि प्रचंड मोठ्या आवाजात डरकाळ्या फोडत ते दोन्ही वाघ एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराच वेळ त्यांच्यात हे तुंबळ युद्ध सुरू होते, जे पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. दशकापासून या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ या व्याघ्रप्रकल्पात आहे. देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांचा ओढा या व्याघ्रप्रकल्पाकडे आहे.
सेलिब्रिटी अभिनेता, अभिनेत्री असो वा क्रिकेटपटू सर्वांसाठी ताडोबा ही पहिली पसंती ठरली आहे. अगदी जुन्या जाणत्या सेलिब्रिटीपासून तर आताच्या सेलिब्रिटींनी या व्याघ्रप्रकल्पाला एकदा नव्हे तर अनेकदा भेट दिली आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेट जगतातील दोन दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर आणि गोलंदाज अनिल कुंबळे व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येऊन गेले. या दोघांनाही वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या वाघांनी दर्शनही दिले. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर हा वर्षातून किमान दोनदा तरी या व्याघ्रप्रकल्पात हजेरी लावतो. विदेशातील क्रिकेटपटूंनाही ताडोबातील वाघांनी वेड लावले आहे. या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या अनेक करामती पाहायला मिळाल्या आहेत. वारसा हक्कासाठी सख्खी भावंडं एकमेकांशी भांडताना आपण कित्येकदा पाहिली आहेत.
हेही वाचा : VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती
पण प्राण्यांच्याही बाबतीत हे होत असेल का! त्यांच्यातही भांडणं होतात. अगदी माणसासारखी. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतच नाही तर अगदी एकमेकांच्या मानगुटीवर बसण्यापर्यंत. मात्र, त्यांची ही भांडणं होतात ती अधिवासासाठी. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हे चित्र दररोज बघायला मिळते. येथे कित्येकदा अधिवासाच्या, अस्तित्वाच्या, वाघिणीवर हक्क दाखवण्यासाठी लढाईत एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत वाघाची मजल गेली आहे. असाच थरार आज पर्यटकांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बेलारा बफर झोनमध्ये अनुभवला.
या व्याघ्रप्रकल्पातील ‘वीरा’ आणि ‘भेला’ या दोन वाघांमध्ये तुंबळ युद्ध रंगले. बराचवेळ हा थरार सुरू होता. हा क्षण कॅमेऱ्यात टिपताना पर्यटक देखील रोमांचित झाले. ‘डेक्कन ड्रीफ्ट’ च पीयूष आकरे यांनी हे दोन्ही वाघ ‘वीरा’ आणि ‘भेला’असल्याचे सांगितले.