चंद्रशेखर बोबडे
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी त्यातील चुरसही अधिक वाढू लागली आहे. अनेकनवे मुद्दे चर्चेला येत आहेत. एकूण मतदारांपैकी ४२ टक्के महिला मतदार असूनही केवळ दोनच महिला रिंगणात असल्याने राजकीय पक्ष व शिक्षक संघटनांच्या महिलांना प्रतिनिधीत्व देण्याच्या दाव्यांवरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>>नागपूर: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची यंदा कसोटी, दोन वर्षांनंतर १०० टक्के अभ्यासक्रम
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या शिक्षक मतदारसंघात येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. विभागात एकूण ३९ हजार ६०४ शिक्षक मतदार असून यात १६ हजार ७०२ महिला तर २२ हजार ७०४ पुरुष मतदारांचा समावेश आहे. एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात फक्त दोन महिला उमेदवार आहेत. त्यात प्रामुख्याने बसपाच्या निमा संजय रंगारी व अपक्ष प्रा. सुषमा सुधाकर भड यांचा समावेश आहे. एकूण मतदारांच्या संख्येत महिला मतदारांचे प्रमाण ४२ टक्के (१६ हजार ७०२) असूनही फक्त दोनच महिला उमेदवार रिंगणात असणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा >>>नागपूर: राज्यात भाजपची सत्ता असतानाही नागपूर महापालिकेची आर्थिक कोंडी, अनेक प्रकल्प रखडले
महिलांना समानसंधी देण्याचा दावा सर्वच राजकीय पक्ष करतात, उमेदवारी देण्याची वेळ येते तेव्हा फक्त पुरुषांचा विचार केला जातो. शिक्षक संघटनाही त्याला अपवाद नाही, अशा प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत. रिंगणात असलेल्या प्रा.सुषमा भड या व्होकेशनल ॲण्ड एज्युकेशन ट्रेनिंग इन्सिट्यूटमधून निवृत्त झालेल्या अधिकारी आहेत. त्या उच्चशिक्षित असून अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून त्या सामाजिक उपक्रम राबवत आहेत. बसपाच्या निमा रंगारी या भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील आहे. त्या बसपाच्या कार्यकर्त्या आहेत. या दोन्ही महिला उमेदवारांशी संपर्क साधला असता त्यांनी एक महिला म्हणून मतदारांकडून मिळणारा उत्स्फर्त प्रतिसाद उत्साह वाढवणारा असल्याचे मत व्यक्त केले.
प्रा. सुषमा भड म्हणाल्या, अनेक महिला शिक्षिका या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे स्वत:चे अनेक प्रश्न आहेत जे कोणी आतापर्यंत मांडलेच नाहीत, त्याकडे शासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून मी रिंगणात आहेत . राजकीय पक्ष किंवा शिक्षक संघटना महिलांना प्रतिनिधीत्वत देत नाही, महिला शिक्षकांचे प्रतिनिधीत्व मी या निवडणुकीत करीत आहे. निमा रंगारी म्हणाल्या पक्षाने महिलेला उमेदवारी देऊन एक पुढचे पाऊल टाकले आहे. मतदारांचा प्रतिसादही दिलासा देणार आहे.
हेही वाचा >>>फेब्रुवारीत आणखी १२ चित्ते भारतात येणार! सामंजस्य करारावर मात्र अद्याप स्वाक्षरी नाही
महिला मतदारांची संख्या निर्णायक स्वरुपातील आहे. त्यामुळे ते प्रस्थापितांचे राजकीय गणित बिघडवू शकतात. पुरूष उमेदवारांच्या गर्दीत महिला उमेदवारांची चर्चा होत नसली तरी त्यांच्याडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही,अशी स्थिती आहे.
जिल्हानिहाय महिला मतदार
नागपूर: ९२५६
वर्धा-४,८९४
भंडारा -१,२२५
गोंदिया- १,२१८
चंद्रपूर- २६८४
गडचिरोली -६३०