नागपूर : प्रसिद्ध व भोसलेकालीन टेकडी गणपती मंदिराला अखेर राज्य शासनाने ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित केले आहे. शासनाने तसा निर्णयही सोमवारी काढला. मंदिराचे बांधकाम अठराव्या शतकात राजे भोसले यांच्या कार्यकाळात झाल्याचे सांगितले जाते.
भोसले आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटे होते. आता त्याचा विकास झाला आहे. येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह इतरही मान्यवरांनी या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आहे. येथे भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे या मंदिराला ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे हे २०१३ पासून या मागणीसाठी पाठपुरावा करीत होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मंदिराला ‘अ’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करावे म्हणून अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. दरम्यान, २०२३ मध्ये फडणवीस यांनी पुन्हा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
१८ ऑगस्टला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठक घेतली होती व मंदिराला ‘अ’ दर्जा द्यावा, असा ठराव पर्यटन मंत्रालयाकडे पाठवला. अखेर ११ मार्च २०२४ ला पर्यटन मंत्रालयाने ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित केले. त्यामुळे या मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.