नागपूर : राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे. विदर्भातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला होता. पण, आता पुन्हा त्यात वाढ झालेली आहे. नागपूरसह गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ आदी जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा घसरल्याने विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून कोरडे हवामान आहे. काही जिल्ह्यात निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश आहे. काही जिल्ह्यांतील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नागपूरसह गोंदिया, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांतील किमान तापमान कालपर्यंत नऊ ते दहा अंश सेल्सिअसवर होते. आज त्यात पुन्हा घसरण झाली आहे. विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर येथे ८.२ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. तर गोंदिया येथे ८.४ व ब्रम्हपुरी येथे ८.५ इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद या तीन जिल्ह्यांत झाली आहे.

हेही वाचा >>> प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू

विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढलाय. विदर्भात थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी आपले आरोग्य जपण्याची सर्वाधिक गरज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. वर्धा जिल्ह्यात देखील ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून उर्वरीत जिल्ह्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मध्यंतरी विदर्भातील तापमान १९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी पुन्हा परतली आहे.

हेही वाचा >>> लोकजागर : पोलीस करतात काय?

नागपूरसह संपूर्ण विदर्भातच थंडीचा कडाका जाणवत आहे. रात्रीच नाही तर दिवसादेखील हुडहुडी भरवणारी थंडी आहे. बुधवारी दिवसभर हुडहुडी भरवणारी थंडी होती. तर आज गुरुवारी देखील थंडीचा कडाका कायम आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घसरण झाली आहे. तर त्याचवेळी कमाल तापमानात देखील मोठा बदल झाला आहे. तब्बल सहा अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे दिवसाही गरम कपड्यांची ऊब आवश्यक झाली असून लहानमोठे अशा सर्वच वयोगटातील नागरिकांच्या अंगावर गरम कपडे दिसून येत आहे. तर सायंकाळपासूनच शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. गरिबांसाठी शेकोट्या हाच आधार ठरत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur temperature recorded at 8 2 degrees celsius minimum temperature drops in vidarbha region rgc 76 zws