प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने ४० हजार रुपयांत सुपारी दिली. कटानुसार केलेल्या चाकूहल्ल्यात पती बचावल्यामुळे पत्नीचे खरे रूप उघड झाले. या प्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली.

ही घटना कळमन्यात उघडकीस आली. मीनाक्षी (२७, काल्पनिक नाव), रोहित विजय मालतुरे (१८, किन्हा, जि. भंडारा), महेश तुळशीदास गेडाम (२७) यांना पोलिसांनी मंगळवारीच अटक केली तर बुधवारी सुभाष गेडाम याला अटक केली. आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी मिनाक्षीचे लग्न झाले होते व त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. पती वयस्कर असल्यामुळे मिनाक्षी नेहमी नाराजी दर्शवित होती. दरम्यान गेल्या वर्षापूर्वी तिचे उमरेडच्या एका युवकासोबत सूत जुळले. पती घरी नसताना दोघांचे प्रेमसंबंध फुलले.

त्यामुळे ती गेल्या तीन वर्षांपूर्वी त्या युवकासोबत पळून गेली होती. त्यानंतर मीनाक्षी आणि त्या युवकामध्ये पटले नाही. त्यामुळे ती एप्रिल महिन्यात पतीकडे परतली होती. चार महिन्यापासून पतीकडे राहू लागली, याच दरम्यान तिचे शैलेष नावाच्या तरुणासोबत सूत जुळले. चार महिन्यात त्या दोघांनी एकमेकासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या दोघांच्या प्रेमात पती अडथळा ठरत होता. त्यामुळे तिने पतीचा काटा काढून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तिचा कॉलेजमधील मित्र सुभाष गेडाम आणि रोहित गावतुरे यांना ४० हजार रुपयांत पतीचा काटा काढण्याची सुपारी दिली. त्यांनी साथीदार महेश गेडाम यालाही सोबत घेतले. मंगळवारी रात्री ११ वाजता मिनाक्षीने घराचा दरवाजा उघडा ठेवला. त्यानंतर आरोपी रोहित, सुभाष आणि महेश हे चाकू घेऊन घरात घुसले. त्यांनी मिनाक्षीच्या पतीला चादरीत गुंडाळले आणि चाकूने हल्ला केला. मात्र, सुदैवाने तो थोडक्यात बचावला.

अशी आली घटना उघडकीस –

पतीवर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर मिनाक्षीचा वागणुकीत फरक पडला. ती पोलिसांना वेगवेगळी उत्तरे देत होती. तसेच तिच्या मोबाईलचा कॉलडाटा काढल्यानंतर ती आरोपींच्या संपर्कात होती, हे स्पष्ट झाले. ठाणेदार विनोद पाटील यांनी मिनाक्षीची कसून चौकशी केली असता, तिने हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. या कटात तिची प्रियकर सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Story img Loader