नागपूर : शहरातील बहुचर्चित विनय पुणेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी हेमंत शुक्ला पिस्तूल कमरेला खोचून रेल्वेत बसून शहरातून पळून गेला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली. पुणेकर हत्याकांडात सदर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली. आरोपींपैकी एकाने पिस्तूल लपवले तर एकाने पळून जाण्यासाठी पैसे आणि वाहन उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. धर्मेंद्र राधेश्याम शर्मा (रायपूर, छत्तीसगड), अभिषेक विनोदकुमार शर्मा(२२ रायपूर, छत्तीसगड) आणि हंसराज संजय चव्हाण (देवसर, हरियाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनय पुणेकर हा सदर येथील त्याच्या राहत्या घरी असताना आरोपी हेमंत शुक्लाने २३ फेब्रुवारीला घरात घुसून विनयवर गोळ्या झाडल्या. हेमंत आणि साक्षी ग्रोवर यांची मैत्री होती. नागपुरात आल्यानंतर साक्षीची विनयशी जवळिक होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. याच कारणावरून हेमंतने विनयची हत्या केली. घटनेच्या वेळी तो साक्षीचा दीर बनून विनयच्या घरात घुसला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.

हेही वाचा…वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता…बुलढाण्यातून आषाढी वारीसाठी सव्वादोनशे बसगाड्या, खामगावातून रेल्वेही…

हत्या केल्यानंतर हेमंत रेल्वेने पळाला. प्रवासादरम्यान त्याने धर्मेंद्रला फोन करून घटनेची माहिती दिली. धर्मेंद्रने त्याला भंडाऱ्यात उतरण्यास सांगितले. त्याच्याकडे रेल्वे तिकीट नसल्याने टीसीने पकडले. मात्र, त्याने सुटका केली आणि भंडाऱ्यात उतरला. धर्मेंद्रने त्याच्यासाठी पुतण्या अभिषेकला रायपूरहून साकोलीला पाठविले. इकडे हेमंत एसटीने साकोलीसाठी निघाला. साकोली बस स्थानकावर उतरल्यानंतर अभिषेक त्याला सोबत रायपूरला घेऊन गेला. नंतर धर्मेंद्रने त्याच्या राहण्याची व्यवस्था केली. पिस्तुलचे काय करायचे?, यासंदर्भात चौघांनीही थंड डोक्याने विचार केला. हंसराजच्या सांगण्यावरून त्याने गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल पूर्ण ताकतीने नदीत फेकली. धर्मेंद्रचे चारचाकी मालवाहू वाहन दिल्लीला जाणार होते. त्याच मालवाहूमध्ये बसवून हेमंतला दिल्लीला पाठविले. त्यानंतर हेमंत विविध शहरात भटकत होता. दरम्यान तो साथीदारांच्या संपर्कात होता. हेमंतला मदत करणे, अटकेपासून वाचविणे, त्याला जागा उपलब्ध करून देणे आणि पळून जाण्याची व्यवस्था केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : वीजतारांच्या वादात बाप-लेकाने शेजाऱ्याचे धड केले शिरावेगळे….

साक्षीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

हेमंत शुक्लाची प्रेयसी साक्षी ग्रोव्हरला आधीच पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडी नंतर तिची कारागृहात रवानगी करण्यात आली. तिच्या वकिलामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. अर्जावर शुक्रवारी दोन्ही बाजुंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. शनिवारी न्यायालयाने साक्षीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur three arrested for helping fugitive in vinay punekar murder case adk 83 psg
Show comments