सात वर्षांपूर्वी शासकीय बालगृहातून तीन मुलांचे अपहरण झाले होते. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. अखेर गुन्हे शाखेने या अपहरण नाट्याचा उलगडा केला असून मुलांना केरळमधून ताब्यात घेतले आहे. त्यांचे अपहरण झाले नसून त्यांनी पलायन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली.
पाटनकर चौकातील शासकीय बालगृहातून ३१ जानेवारी २०१५ मध्ये १०, ११, १३ वर्षे या वयोगटातील तीन मुलांचे अज्ञात आरोपीने अपहरण केल्याची तक्रार आली. या प्रकरणी बालगृह अधीक्षकांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. जरीपटका पोलिसांनी बरेच कष्ट घेतले. परंतु, अपहृत मुलांचा शोध काही लागला नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) सुरू केला. या पथकाने तांत्रिक तपास करीत २ फेब्रुवारी २०१५ मध्ये तीनपैकी एका मुलाचा शोध घेतला. त्या मुलाला केरळमधून ताब्यात घेण्यात आले. त्या मुलाला पुन्हा शासकीय बालगृहात पाठविण्यात आले. तो मुलगा सध्या नागसेननगरातील प्राथमिक शाळेत शिकत आहे. त्याच्यासोबत पलायन केलेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी एएचटीयूने पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी शेवटी दोन्ही मुलांचा पत्ता शोधला. त्या दोघांनाही केरळ राज्यातील काझीकोट जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही मुलांना नागपुरात आणण्यात आले. त्यांनी शाळेतून पलायन केल्याची कबुली दिली. त्यांना शासकीय बालगृहात सोडण्यात आले. घटनेच्या सात वर्षांनंतर दोन मुलांना शोधण्यात एएचटीयूला यश आले.
हे देखील वाचा – भंडारा : ‘देव तारी त्याला कोण मारी’; नदीपात्रात नाव उलटली तरी सहा जण बचावले!
या गुन्ह्यात कोणत्याही अनैतिक मानवी वाहतुकीचा प्रकार दिसून येत नसल्याने पोलिसांनी मुलांना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, एएचटीयूच्या पोलीस निरीक्षक मंदा मनगटे, सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, गजानन चांभारे, मनिष पराये, राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे, आरती चव्हाण आणि पल्लवी वंजारी यांनी केली.