नागपूर : नागपूरच्या एका दाम्पत्यासह ११ लोकांनी नागपूर ते लंडन असा १६ हजार किलोमीटरचा प्रवास चक्क कारने केला. ६५ दिवसांच्या या प्रवासात रस्त्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात २१ देशांच्या सीमा यांनी ओलांडत नागपूरकरांनी ही कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरच्या दिनेश राठी यांनी त्यांच्या पत्नीसह ही कामगिरी केली आहे. यात त्यांना इतर नऊ लोकांनीही सहप्रवासी म्हणून साथ दिली. रस्तावरून जगाचे भ्रमण करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर दिनेश राठी यांनी आनंद व्यक्त केला. १७ एप्रिल रोजी दिनेश यांनी त्यांच्या साथीदारासह प्रवासाची सुरुवात केली. यादरम्यान तिबेटमधील माउंट एवरेस्ट ते मध्य आशियातील पामीर पर्वत शृंखला ते युरोपमधील आल्प पर्वत रांग याचा अनुभव त्यांनी घेतला.

सुमारे साडेपाच हजार मीटरच्या उंचीवरील रस्त्यातून त्यांनी आपल्या स्वप्नाना मार्ग काढत प्रवास केला. प्रवासातील अनुभव सांगताना दिनेश यांनी सांगितले की, प्रत्येक देशाची सीमा ओलांडताना वेगवेगळे आव्हान पुढे आले. चीनमधून प्रवास करताना अतिशय अडचणींना सामोरे गेलो. भारतातून चीनमध्ये थेट प्रवेश करता येत नाही. यासाठी विशेष परवानगी मिळविणे गरजेचे असते. ही परवानगी मिळविणेही वेगळेच आव्हान होते. प्रवासातून अनेक देशातील सांस्कृतिक वैभव जवळून बघायची संधी मिळाली. यामुळे जागतिक दृष्टिकोनात मोठा फरक झाला. जसा आपण जगाचा विचार करतो, तसे जग नाही आहे, याची प्रचिती प्रवासादरम्यान आली. अनेक देशातील सुरक्षारक्षकांना फार कडक मानले जाते. मात्र आम्हाला प्रत्येक देशातील सुरक्षा रक्षकांनी मोठ्या मनाने मदत केली. प्रवासादरम्यान त्या त्या देशातील नागरिकांनीही जिव्हाळ्याने स्वागत केले. भाषेतील फरक असतानाही त्यांनी आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले. प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा २३ लोक एकत्र होते, मात्र लंडनपर्यंतचा प्रवास केवळ ११ लोक यशस्वीपणे करू शकले.

हेही वाचा – मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील प्रवासी रेल्वे स्थानकातून घरी

हेही वाचा – ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे अतोनात हाल

दररोज ५०० किमी प्रवास

प्रवासात अनेक पर्वतरांगा, कठीण रस्ते होते. तरीदेखील दररोज ५०० किलोमीटर प्रवास करण्याचा निश्चय केला होता. सामान्य ठिकाणी ७०० किलोमीटर प्रतिदिन प्रवास केला. गोठवणारी थंडी ते ऑक्सिजनची कमतरता असलेले पर्वत असे विविध अनुभव प्रवासादरम्यान आले. प्रवासादरम्यान खाण्यासाठी आणि राहण्यासाठी अतिशय विचारपूर्वक योजना आखली होती. या प्रवासात प्रति व्यक्ती २५ लाख रुपये इतका खर्च आला आहे, अशी माहिती दिनेश राठी यांनी दिली. हा केवळ लंडन गाठण्याचा प्रवास नव्हता तर शारीरिक आणि सांस्कृतिक सीमेपलिकडे जीवन जगण्याचा एक प्रयत्न होता, असे दिनेश राठी यांनी आवर्जून सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur to london a journey of 16 thousand kilometers by car tpd 96 ssb
Show comments