नागपूर : नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद असल्याने या गाडीचे डबे २० वरून आठ करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील निर्णय लवकरच रेल्वे बोर्ड घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला अल्प प्रतिसाद बघता या गाडीचे डबे कमी करण्यात येणार आहे. परंतु अद्याप रेल्वे बोर्डाने हा बदल करण्याची तारीख निश्चित केलेली नाही. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरु करण्यात आली. गाडी लोकप्रिय होण्यास विलंब लागतो, त्यामुळे सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळत असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु गेल्या महिन्यात तिकीट विक्रीचा आलेख बघता डब्याची संख्या कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे.
देशातील काही निवडक मार्गावर २० डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. त्यात नागपूर-सिंकदराबाद या मार्गाचा समावेश आहे. आता ही गाडी ८ डब्यांची करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय रेल्वे व्यवस्थापक गर्ग म्हणाले, वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेत असतो. विभागीय कार्यालयातून त्याबाबत निर्णय घेतला जात नाही. अशाप्रकारचे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस १८ डब्यांवरून आठ डबे करण्यात आले आहे. आता ही गाडी फुल्ल सुरू आहे. अनेकदा तर ही गाडी १०० टक्के भरलेली असते.
वंदे भारत एक्स्प्रेसचे डब्यांची संख्या तिकीट विक्रीच्या आधारे ठरविल्या जाते. काही वंदे भारतच्या डब्यांची संख्या २० वरून ८ कमी केली जाते तर काही गाड्यांच्या डब्यांची संख्या १६ वरून २० करण्यात आल्या आहे. गाडी क्र. २०१०१/०२ नागपूर- सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार सोडून आठवड्यातील ६ दिवस चालवण्यात येत आहे. ही गाडी एकूण ५८५ किमीचे अंतर ७ तास २० मिनिटांत पूर्ण करीत आहे. नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नागपूर दररोज सकाळी ५ वाजता सुटल्यानंतर सिकंदराबाद येथे दुपारी १२.१५ वाजता पोहोचते. नागपूर येथून सुटल्यानंतर ही गाडी सेवाग्राम- ५.४३ वाजता, चंद्रपूर ७.०३, बल्लारशहा-७.२०, रामागुंडम ९.०८, काजीपेठ- १०.४ वा वाजता, तर सिकंदराबाद येथे दुपारी १२.१५ वाजता पोहोचते. २०१०२ वंदे भारत सिकंदराबाद येथून दुपारी १ सुटल्यानंतर रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचते. ही गाडी काजीपेठ ०२.१८ वाजता, रामागुंडम ०३.१३, बल्लारशहा ०५.२५, चंद्रपूर ०५.४० वा., सेवाग्राम ०७.१३, तर नागपूर स्थानकावर ही गाडी रात्री ८.२० वाजता पोहोचते.