नागपूर : काटोल मतदारसंघातील मूर्ती येथील देशभ्रतार व कोराडी येथील वाघमारे कुटुंबीय हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. पहलगाम येथे सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या वेळी हे दोन्ही कुटुंब घटनास्थळाच्या काहीच अंतरावर होते. सध्या ते श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. तसेच राज्य शासनाला या कुटुंबीयांची माहिती देवून त्यांना सुखरुप आणण्याची विनंती केली.

मूर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार त्यांच्या पत्नी मेघा तसेच कोराडी येथील पुथ्वीराज वाघमारे त्यांच्या पत्नी मनिषा आणि मुली श्रेयषा व एकता हे श्रीनगर येथे फिरण्यासाठी गेले होते. सोमवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते घटनास्थळाच्या काहीच अंतरावर होते. ज्या गाडीतून हे दहशतवादी आले होते त्या गाडीचा प्रफुल्ल यांना संशय आला होता आणि त्याने स्थानिक घोडेवाल्याकडे याची विचारणा केल्याची माहिती त्यांनी अनिल देशमुख यांना सांगितली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही श्रीनगर येथे हॉटेलला सुखरुप आलो असल्याचेही त्यांनी अनिल देशमुख यांना सांगितले. अनिल देशमुख यांनी दोन्ही कुटुंबीयांना हिम्मत दिली. देशभ्रतार आणि वाघमारे कुटुंबीयांना लवकरात लवकर नागपूरला आणण्यासाठी प्रशासनाला त्यांची माहिती देत विनंती केली.