नागपूर : अंबाझरी तलावातील पाणी वाहून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे अंबाझरी परिसरातून वळवलेल्या वाहनांमुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीवर पर्याय शोधण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांवर ते नाराजी व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर वाहतूक पोलीस, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अंबाझरी पुलाचे बांधकाम करण्यापूर्वी योग्य नियोजन केले नाही. तीनही विभागांमध्ये योग्य समन्वय नाही. त्याचा मोठा फटका अंबाझरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. हिंगणाकडून शहरात येणारी वाहनांची संख्या मोठी आहे. अंबाझरी तलाव मार्ग नेहमी गजबजलेला असतो.

हेही वाचा – नागपूर एम्समध्ये बायपास शस्त्रक्रिया ठप्प, भूलतज्ज्ञ सुट्टीवर…

अंबाझरी पुलाच्या बांधकामासाठी रस्ता पूर्णपणे बंद केल्यामुळे एका रस्त्यावरील सर्वच वाहनांना दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आले. त्यामुळे अंबाझरी तलावाकडून जाणाऱ्या वाहनांचा भार आयटी पार्क चौक, माटे चौक, व्हीएनआयटी कॉलेज चौक, प्रतापनगर या मार्गावर पडला. परिणामी, वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. कामगार कॉलनी ते सुभाषनगर झोपडपट्टी चौकापर्यंतच्या रस्त्यापासून ते गोपालनगर चौक ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत सलग वाहतूक कोंडी असल्यामुळे या रस्त्यावर असलेल्या लहान गल्ल्यांमधून वाहनांची रेलचेल होऊ लागली आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी लहान गल्लीबोळातील मार्गाचा वापर वाढला आहे. अनेक जण या रस्त्यांचा वापर करीत असल्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. रात्री-बेरात्रीपर्यंत वाहतूक सुरू असल्यामुळे गाड्यांच्या आवाजांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासोबतच खाद्यपदार्थाचे हातठेलेसुद्धा याच लहान गल्लीबोळातून आयटी पार्क ते माटे चौकापर्यंत पोहचतात. त्यामुळे मोठ्या रस्त्यासह लहान गल्लीबोळातही आता वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

नियोजनात प्रशासन अपयशी

हिंगणाकडून येणारी सर्व वाहने अचानक वळवण्यात आल्यामुळे अन्य पर्यायी रस्त्यांवरील भार वाढला. त्यामुळे होणाऱ्या अडचणींचा विचार प्रशासनाने केला नाही. वाहतूक वळवण्याबाबत योग्य नियोजन करण्यात प्रशासन चुकले. गेल्या १५ दिवसांपासून आयटी पार्क ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत सलग वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे.

रस्त्यावरील बांधकाम साहित्यामुळे त्रास

माटे चौक ते श्रद्धानंद चौकापर्यंत चार बहुमजली इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करणाऱ्या मालकांनी अगदी रस्त्यावरच वाळू, गिट्टी, सळाखी आणि विटा ठेवल्या आहेत. आधीच वाहनांची संख्या जास्त आणि त्यातही रस्त्यावर बांधकाम साहित्य असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. फुड कोर्ट, अण्णा इडली, डोमिनोज, बर्गरसिंह आणि पिझ्झा हट यासह अन्य दुकानांसमोरील रस्त्यावर ग्राहकांच्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या असतात. परिसरातील वाहतूक कोंडीचे हेसुद्धा एक कारण आहे.

अजूनही रस्त्यावर खाद्यपदार्थांची दुकाने

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंत सलग वाहतूक कोंडी होत असली तरी रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना मात्र त्याचे काही देणे-घेणे नाही. वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोध पथक कारवाई करण्याची हिंंमत करीत नाही. खाद्यपदार्थांची दुकाने पदपथाखाली आली तर ग्राहकांची वाहने अर्ध्या रस्त्यापर्यंत उभी असतात. याकडे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांचे सपशेल दुर्लक्ष आहे.

प्रवेशद्वार उघडण्यास व्हीएनआयटीचा नकार

अंबाझरी परिसरातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी व्हीएनआयटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून पर्यायी रस्ता देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनानाने प्रवेशद्वार सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता व्हीएनआयटी प्रवेशद्वाराचा पर्याय संपला आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : आर्ली प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांचे इरई धरण परिसरात आगमन, विणीच्या हंगामासाठी पाच हजार किमीचा प्रवास

अंबाझरी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामामुळे योग्य नियोजन करून वाहतूक वळवण्यात आली आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीची गती कमी झाली आहे. या परिसरातील प्रत्येक मोठ्या चौकात वाहतूक पोलीस तैनात आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. – शशिकांत सातव (पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा)

पोलीस विभागाचे नियोजन चुकल्याचा फटका वाहनचालकांना बसला आहे. अंबाझरी परिसरातील प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्यावरच हातठेले लागलेले आहे. अगदी गल्लीबोळातूनही वाहनांची संख्या वाढल्याने कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. – विनोद लुटे (कारचालक)
………..

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur traffic jam in it park ambazari again traffic police municipal administration are lax adk 83 ssb