नागपूर : सध्या शहरात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून चौकाचौकात वाहतूक पोलिसांची पथके कारवाई (चालान) करताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांचे ‘मार्च एन्ड’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई सत्र सुरू असल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षभरात वाहतूक पोलीस वाहनचालकांवर संथगतीने कारवाई करतात. चालान कमी आणि वसुलीच जास्त या धोरणाचा अवलंब करून कारवाई करण्याचे टाळतात. मात्र, मार्च महिना आल्यानंतर वाहतूक पोलीस खडबडून जागे होतात. वर्षभराचे कारवाईचे (चालान) उदिष्ट पूर्ण करण्यासाठी कारवाई सत्र राबवले जाते. सध्या सकाळपासून रात्रीपर्यंत ‘चालान डिव्हाईस’ घेऊन प्रमुख चौकांत वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसतात. पोलिसांना पाहताच ‘यू टर्न’ घेत असल्याचे चित्र आहे. वर्धा मार्ग, मनीषनगर, हिंगणा टी पॉइंट, प्रतापनगर, इंदोरा, पाचपावली, जरीपटका, टेकानाका, धरमपेठ, सीताबर्डी, लकडगंज, गंगाजमुना, गोळीबार चौक, बडकस-महाल चौक, सोनेगाव चौक, वाडी नाका, धंतोली इत्यादी ठिकाणी वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे. ‘मार्च एन्ड’चे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीस धावपळ करीत असल्याचे समोर आले आहे. वर्षभर कमाई आणि वसुलीवर भर देणारे वाहतूक पोलीस आता मात्र सुरळीतपणे चालान कारवाई करीत असल्याची चर्चा आहे.
चित्रफितीने उडवली तारांबळ
इंदोरा वाहतूक शाखेतील दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दुचाकीचालकाला हेल्मेट नसल्यामुळे थांबवले होते. त्या युवकांवर चालान करण्याऐवजी त्यांच्याकडून चक्क लाच घेतल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. कारवाईचा सपाटा लावलेला असताना काही कर्मचारी थेट लाच घेतल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी उपायुक्त चौकशी करीत आहेत. एकीकडे कारवाईचा धडाका, तर दुसरीकडे वसुली असा प्रकार समोर आला आहे.
वाहतूक नियमांचे पालन करा
वाहनचालकांनी वाहनांची कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना सोबत बाळगावा. हेल्मेटचा वापर करावा आणि कारचालकांनी सिटबेल्ट लावावा. वाहतूक पोलीस नियमांनुसार कारवाई करीत आहेत. पोलिसांची कारवाई टाळायची असेल तर वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कागदपत्र सोबत बाळगावे. नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी केले आहे.