नागपूर : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वनभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त लावला होता. त्यामुळे अनुचित घटना घडली नसली तरी वाहतूक शाखेने दोन्ही दिवसांत पाच हजारजणांवर कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिसांद्वारे कोंबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी चोवीस तास रस्त्यावर पोलीस दिसून आले. त्यामुळे गुन्हेगार किंवा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना डोके वर काढता आला नाही. दरम्यान वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १२९ जणांवर कारवाई करून ८५ वाहने जप्त केलीत. दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ बसणाऱ्या ३०७ जणांवर कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने जाणारे, सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणारे, चुकीच्या जागी पार्किंग करणारे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करणाऱ्या ४ हजार ७६३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा – बुलढाणा : चिखली राज्यमार्गावर आढळला युवकाचा मृतदेह
”होळी-धुळवडीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे होळीला कोणतीही वाईट घटना घडली नाही”, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.