नागपुरमध्ये ‘स्वाईन फ्लू’ चा संसर्ग वाढत असून सध्या शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे तब्बल ४६ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहराच्या दोन वेगवेगळ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून दोन मृत्यूंचा अहवाल ठेवला गेला. त्यातील एका मृत्यूला ‘स्वाईन फ्लू’ तर दुसऱ्याचे कारण इतर असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर महापालिकेकडून एकूण ४ मृत्यूंचा अहवाल ठेवला. त्यात तीन मृत्यू नागपूर शहरातील तर एक जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. हे चारही मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे येथील ‘स्वाईन फ्लू’ची मृत्यूसंख्या ५ नोंदवली गेली.

आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’चे ७५ रुग्ण नोंदवले गेले –

दरम्यान, नागपूरच्या विविध रुग्णालयांत आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’चे तब्बल ७५ रुग्ण नोंदवले गेले. त्यातील सर्वाधिक ४५ रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील आहे. तर इतर रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी १९ जण बरे होऊन घरी परतले आहे, तर ४६ रुग्णांवर विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहे. त्यातील २ अत्यवस्थ रुग्ण हे जीवनरक्षण प्रणालीवर आहेत, तर ६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णामध्ये मेडिकल रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. या डॉक्टरची प्रकृती आता बरी आहे.

दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या बघता आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लू संशयितांचे नमुने मोठ्या संख्येने विविध शासकीय प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबत हा आजार आढळणाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत पोहचण्यासह सर्वसामान्यांत या आजाराच्या जनजागृतीवरही भर दिला जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Story img Loader