राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत सर्व प्रवर्गांतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून ५९ उमेदवार रिंगणात राहणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी केवळ दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम यादी विद्यापीठाने जाहीर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नागपूर : कुलगुरूंची नामुष्की, अवैध ठरवलेले अर्ज न्यायालयाकडून वैध

या यादीनुसार आता खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी ३० उमेदवार आहेत. या गटात हर्षवर्धन कापसे, ललित खंडेलवाल, अभिजीत मेश्राम, माधुरी पालीवाल आणि वीणा सरदार यांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आला आहे. अनुसूचित जाती गटात एका जागेसाठी ६ उमेदवार, अनुसूचित जमाती गटात एका जागेसाठी पाच उमेदवार, विमुक्त जाती गटात एका जागेसाठी सात उमेदवार, इतर मागासवर्गीय गटात एका जागेसाठी ७ उमेदवार आणि महिला गटात सहा उमेदवार आहेत.

या निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची छाननीनंतरची तात्पुरती यादी १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यावर, कुलगुरूंकडे अपील करण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानंतर बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. २ डिसेंबर रोजी निवडणुकीची मतमोजणी होईल.

हेही वाचा- ‘हवामान बदल कामगिरी निर्देशांका’त भारताची कामगिरी सुधारली; दहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर 


हिस्लॉपमध्ये मतदान केंद्र

विद्यापीठ विधिसभा, विद्वत परिषद व अभ्यासमंडळ निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी शासकीय विज्ञान संस्था, नागपूर येथे मतदान केंद्र देण्यात आले होते. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. हिस्लॉप महाविद्यालयात आता हे मतदान केंद्र राहणार आहे. केवळ, २० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी हा बदल करण्यात आला असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे.

हेही वाचा- नागपूर: ‘एअर शो”पूर्वीच नागपूरकरांनी अनुभवल्या विमानांच्या चित्तथरारक कवायती

प्राधिकृत प्रतिनिधींसाठी करा अर्ज

विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळ निवडणुकीची मतमोजणी नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील तळमजल्यावरील सभागृहात २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी ज्या उमेदवारांना मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहावयाचे असेल किंवा त्यांच्या प्रतिनिधीस प्राधिकृत करावयाचे असेल अशा उमेदवारांनी अर्ज करावे लागणार आहेत. विद्यापीठाच्या निवडणूक कक्षातून दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते ५ या वेळेत अर्ज प्राप्त करून घ्यावे व ते लेखी स्वरूपात तेथेच भरून द्यावे. निवडणूक कक्षाकडून उमेदवार तसेच प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university announced legislative assembly graduate constituency election final list of candidates of all categories dpj