नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू असून बी.ए. चौथ्या सत्राच्या इतिहासाच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मात्र, विषय तज्ज्ञांनी हा आरोप खोडून काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर आधारित प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या जवळपास बाराशे उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून आता नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. बी.ए. द्वितीय वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या इतिहास विषयाचा पेपर मंगळवारी घेण्यात आला. यामध्ये अकरा गुणांसाठी प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर टिपा लिहा असा प्रश्न देण्यात आला आहे. यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा : नागपूर: प्रेमीयुगुलांना पोलिसांनीच लुटले…गुन्हाही दाखल, पण आता न्यायालयात…
अभ्यासक्रमामध्ये डॉ. हेडगेवार यांच्यासंदर्भात कुठलाही उल्लेख नसताना जाणीवपूर्वक हा प्रश्न देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, विषय तज्ज्ञांनी हा आरोप खोडून काढला आहे. तीन वर्षांआधीच नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘राष्ट्रउभारणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ हा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. हेडगेवारांवर टिपा लिहा हा प्रश्न त्याचाच भाग असल्याचा दावा विषय तज्ज्ञांनी केला आहे.
बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासामध्ये ‘राष्ट्रउभारणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ या विषयाचा समावेश आहे. त्यामुळे संघाची स्थापना करणाऱ्या डॉ. हेडगेवारांचा उल्लेख टाळता येणार नाही. त्यामुळे हा प्रश्न अभ्यासक्रमाचाच भाग आहे. विद्यार्थ्यांनी संभ्रमात राहू नये.
डॉ. प्रा. सतीश चाफले, इतिहास तज्ज्ञ
तब्बल ७८ परीक्षांचे निकाल जाहीर
नागपूर विद्यापीठाच्या जवळपास बाराशे उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून आता नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षांनाही सुरुवात झाली आहे. या परीक्षा संपताच निकालाला गती मिळाली आहे. मागील दोन वर्षांत विद्यापीठाच्या अनेक परीक्षांचे निकाल रखडले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षातील प्रवेशावरही परिणाम झाले होते. विद्यापीठाच्या त्यांच्या शैक्षणिक परिसरातील विभागांना स्वायत्तता दिल्यानंतर त्यांच्या परीक्षांचे निकाल चार ते पाच महिने रखडले होते. मात्र, आता परीक्षा विभागाने निकालाची गाडी रुळावर आणली आहे. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात काहीसा गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता परीक्षा सुरळीत सुरू असून निकालालाही गती मिळाली आहे. परीक्षा सुरू असतानाच तब्बल ७८ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.