नागपूर : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणारे निकाल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधरच्या निवडणुकीत लागले आहेत. राखीव प्रवर्गांच्या सर्वच पाच जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला, तर खुल्या जागेवरही चार उमेदवार आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे मविआचे उमेदवार विजयाच्या जवळही पोहचू शकले नाही.
पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राखीव जागांवर ‘अभाविप’चे फुलेकर प्रथमेश सचिदानंद (अनुसूचित जाती), फुडके सुनील रामदास, शेराम दिनेश अंबादास ( अनुसूचित जमाती), तुर्के वामन देवराव ( विमुक्त जाती), खेळकर रोशनी राहुल (महिला राखीव) विजयी झाले. तर खुल्या वर्गातून वसंत चुटे, अजय चव्हाण, विष्णू चांगदे, मनीष वंजारी हे उमेदवार आघाडीवर आहेत. यावेळी तायवाडे, वंजारी आणि अन्य संघटना एकत्र आल्याने अभाविपला टक्कर देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र यावेळी अभविपने सर्वांना धोबीपछाड दिला. मागील निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील दोन जागांवर विजय मिळवणारी परिवर्तन पॅनलही यावेळी कुठेही शर्यतीत नाही.