नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अट्टाहासामुळे परीक्षेचे काम ‘एमकेसीएल’ला देण्यात आले. मात्र, आता प्रशासन तोंडघशी पडले असून, ‘एमकेसीएल’कडून विद्यार्थ्यांची माहिती न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षाच होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमकेसीएल’ने वित्त विभागाकडे ३३ लाखांची देयके सादर केली आहेत. परंतु, संंबंधित कंपनीशी झालेला करारच अवैध असल्याने त्यांना पैसे कुठल्या आधारावर देणार, असा काहींचा आक्षेप आहे. त्यामुळे, कुलगुरूंच्या चुकीच्या निर्णयाचा फटका प्रशासनासह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा – लोकजागर :या जीवांचे मोल काय?

कुलगुरू डॉ. चौधरी यांनी ‘एमकेसीएल’सोबत विद्यापीठाचा करार रद्द झालेला असतानाही संबंधित कंपनीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्यांना परीक्षेचे काम देण्याचा निर्णय घेतला. ‘एमकेसीएल’ने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संकलित करून परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षांचा निकाल सहा महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटूनही जाहीर करता आला नाही. यासंदर्भात राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे अनेक तक्रारी झाल्या. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर विद्यापीठामध्ये संबंधित विषयावर बैठक घेऊन ‘एमकेसीएल’सोबतचा करार रद्द करण्याच्या सूचना दिल्या. विद्यापीठाने काही महिन्यांनी करार रद्द केला. मात्र, आता ‘एमकेसीएल’ परीक्षेचे काम केल्यामुळे विद्यापीठाकडे ८६ लाख रुपयांची मागणी करत आहे. ‘एमकेसीएल’ला पैसे न दिल्यास ते विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे असलेली संपूर्ण माहिती देणार नाही. माहिती न मिळाल्यास विद्यापीठाला पुढील परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षांना आडकाठी निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अमरावती : नाट्यमय घडामोडी! अमरावती पदवीधर मतदारसंघातून धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न

‘एमकेसीएल’ने नुकतेच वित्त विभागाकडे ३३ लाख रुपयांची देयके पाठवली आहेत. मात्र, या कंपनीसोबतचा करारच अवैध असल्याने त्यांना पैसे कुठल्या आधारावर द्यायचे, असा प्रश्न आहे. ‘एमकेसीएल’ला पैसे देण्यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे, कुलगुरूंनी घातलेल्या गोंधळामुळे प्रशासनासह विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university exam may not happen if mkcl not give student information dag 87 ssb
Show comments