नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आपल्या परीक्षेतील गोंधळासाठी तसे प्रसिद्धच आहे. त्यातच भर घालणारा प्रकार गुरुवारी घडला. सध्या विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहे. ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स’ या अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्रातील दोन पेपर विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी घेण्यात येणार होते. यामध्ये, अप्लाइड आर्ट्स विषयातील हिस्ट्री ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन्स आणि चित्रकला विषयातील हिस्ट्री ऑफ आर्ट्स या दोन विषयांचे पेपर सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत होणार होते. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर दिल्यानुसार विद्यार्थी अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय या परीक्षाकेंद्रावर दिलेल्या वेळेत पोहोचले. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने अशा कोणत्याही परीक्षेबद्दल त्यांना कल्पनाच नसल्याचे सांगितले. नागपूर विद्यापीठाने अशा प्रकारची परीक्षा गुरुवारी घेण्यात येणार आहे असे गुंडेवार महाविद्यालयाला कळवलेच नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे, महाविद्यालयाकडे परीक्षा घेण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी झाली नव्हती.
हेही वाचा : नागपूर: दुर्दैवी… विजेचा धक्का लागून चिमुकलीसह दोघांचा मृत्यू
शिवाय, विद्यार्थ्यांना देण्यासाठी विद्यापीठाने त्यांच्याकडे कोणत्याही प्रश्नपत्रिकाही पाठवलेल्या नव्हत्या. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशपत्रावर केंद्राचा उल्लेख आहे आणि केंद्राला मात्र काहीच माहिती नाही, अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी त्यांची परीक्षा घेण्यात यावी यासाठी आग्रह सुरू केला. अखेरीस गुंडेवार महाविद्यालयाच्या प्रशासनाने नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर, विद्यापीठस्तरावर धावपळ सुरू झाली. आलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी अशा सूचना विद्यापीठाने दिल्यानंतर वेळेवर केंद्राधिकाऱ्यांना परीक्षेची तयारी करावी लागली.
हेही वाचा : नागपूर: तळपत्या उन्हातही टेकडी गणपती मंदिर परिसर थंडा थंडा कुल कुल… स्प्रिंकलरमुळे भाविक गारेगार…
त्यानंतर विद्यापीठाने संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका केंद्राला पाठवली आणि छापील प्रती विद्यार्थ्यांना देऊन परीक्षा सुरू करण्यात आली. या सगळ्या गोंधळात प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास सुमारे अर्धा तास उशीर झाला. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना वेळ वाढवून देऊन पेपर पूर्ण करण्याची अनुमती देण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे विविध कॉलेजांमधून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आणि केंद्राला मनस्ताप सहन करावा लागला.