नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १५ मे पासून या परीक्षांना प्रारंभ होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ६ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठाने उन्हाळी-२०२३ या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या सत्रांच्या तसेच वार्षिक परीक्षांसाठीच्या वेळापत्रकांचा यामध्ये समावेश आहे.
त्याचप्रमाणे, पदव्युत्तर पदवीमधील तिसरे आणि चौथे सत्र तसेच सर्व पदविकांच्या वेळापत्रकांचीही घोषणा केली जाणार आहे. या सर्व परीक्षांचे अर्ज भरण्यासाठीही विद्यापीठाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या नियमित तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनच हे अर्ज भरावयाचे आहेत.
हेही वाचा >>> गारांचा चौफेर मारा, नागपूर जिल्ह्यात १२ हजार कोंबड्यांचा मृत्यू
परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ६ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आवदनपत्रे विद्यापीठात सादर करण्यासाठी ८ मे ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण आल्यास सामान्य परीक्षा विभागाचे सहायक कुलसचिव नितीन कडबे (९४२१६९५५३) तसेच व्यावसायिक परीक्षा विभागाचे अधीक्षक धनुसिंग पवार (७७९८१३५८५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त होणारे आवेदनपत्र विलंबशुल्क आकारून स्वीकारण्यात येतील, असेही विद्यापीठाने कळवले आहे.