नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालात यंदा काहीशी वाढ झाली आहे. यामुळे प्रथम वर्ष प्रवेशासासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यापीठाने अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी परिपत्रक जाहीर केले असून त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशासाठी जाण्याआधी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ३ ते २५ जूनपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे.
नोंदणी झाली की विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंतच प्रवेश घ्यावयाच्या महाविद्यालयामध्ये नोंदणी पावती व प्रवेश अर्ज जमा करायचा आहे. नागपूर विद्यापीठाने मागील वर्षी पदवी प्रथम वर्ष प्रवेशादरम्यान समान वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. यंदादेखील विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेसाठी समान वेळापत्रक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीचा निकाल लागल्यापासून २५ जूनपर्यंत नोंदणी करून सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. मात्र, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून कागदपत्र अपलोड केल्याशिवाय विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कागदपत्रांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.
हेही वाचा : नागपूर: प्रेमीयुगुलांना पोलिसांनीच लुटले…गुन्हाही दाखल, पण आता न्यायालयात…
त्यानंतर महाविद्यालयांना गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी २८ जूनला जाहीर होणार आहे. तसेच २८ जून ते ०४ जुलैदरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश ०५ ते ०८ जुलैदरम्यान निश्चित करावयाचे आहे. आवश्यकता पडल्यास समुपदेशन व ‘स्पॉट अडॅमिशन’ करता येणार आहे. विद्यापीठाने सदर वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहे. गेल्यावर्षी नियमांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
‘पात्रता गुण’ वाढणार
बारावीच्या निकालात यंदा नागपूर विभागाने बाजी मारली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतही वाढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ हजारांहून अधिक आहे. मागील काही वर्षांत पारंपरिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यामुळे पारंपरिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत यंदा प्रवेशाचे ‘पात्रता गुण’ ही वाढणार आहे.
हेही वाचा : अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा काळाबाजार, दुप्पट दराने विक्री; कृषी विभागाकडून…
प्रवेशाचे वेळापत्रक
विद्यापीठ संकेतस्थळावर नोंदणी – ०३ ते २५ जून
अर्जाची विक्री व स्वीकार – ०१ ते २५ जून
गुणवत्ता यादी – २८ जून
प्रवेश निश्चिती – २८ जून ते ०४ जुलै
प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश – ०५ ते ०८ जुलै