लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मध्य भारतातील सर्वात जुन्या व स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन नागपूर विद्यापीठाला गौरवशाली इतिहास आहे. विद्यापीठाच्या २६ डिसेंबर १९५०ला झालेल्या ३०व्या दीक्षांत सोहळ्याला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिवार २ डिसेंबरला होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११व्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी १० वाजता हा सोहळा होणार आहे.

नागपूर विद्यापीठ आपले शतकोत्तर वर्ष साजरे करीत आहेत. या वर्षात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दीक्षांत सोहळा होणे ही विद्यापीठासाठी गौरवाची बाब ठरणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत सोहळा माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या शतकोत्तर वर्षात होणाऱ्या १११ व्या दीक्षांत सोहळ्याला विद्यमान राष्ट्रपती येत आहेत. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा-‘ऑपरेशन मुस्‍कान’मुळे १० मुले सुरक्षित घरट्यात

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे स्वागतपर प्रास्ताविक होईल. लोकप्रतिनिधी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि विद्यार्थी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाले असून हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष आहे. विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ व उन्हाळी २०२३ मधील परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय १२९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university has a hundred years of history the first president came in 1 0 dag 87 mrj