नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीदरम्यान परीक्षा शुल्कात वाढ होण्याचे संकेत प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिले. ज्येष्ठ सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी परीक्षा केंद्रासाठी संलग्नित महाविद्यालयांना पुरवण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा प्रस्ताव मांडला. यावर चर्चा सुरू असताना कुलगुरूंनी परीक्षा हे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. परंतु, सध्या परीक्षा शुल्कातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे. त्यामुळे भविष्यात परीक्षा शुल्क वाढवण्याची गरज असल्याचे कुलगुरू म्हणाले. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा >>> पाच राज्ये अन् चार हजार कि.मी.चा प्रवास; ताडोबातील गिधाड तामिळनाडूत
गुरुवारी विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डाॅ. भोयर यांनी प्रस्ताव मांडला. विद्यापीठातर्फे परीक्षा केंद्र असलेल्या संलग्न महाविद्यालयांना संगणक किंवा लॅपटॉप, छायांकित प्रत यंत्र व जनित्र आदी यंत्रसामुग्री विद्यापीठाने देण्याचे ठरवले होते. सहा वर्षांपूर्वी ही यंत्रसामुग्री काही महाविद्यालयांना दिली होती. ती आता निकामी झाली आहे. तरी पुन्हा नवीन यंत्रसामुग्री पुरवण्यात यावी, अशी मागणी केली. यावर सर्वांनी अनुमती दिली. डाॅ. भोयर म्हणाले की, विद्यापीठाचे परीक्षा केंद्र जवळपास १५० महाविद्यालयांमध्ये आहे. परंतु, त्यांना देण्यात आलेली यंत्रसामग्री खराब झाली आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च महाविद्यालयांना परवडण्याजोगा नाही. तसेच ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवल्या जात असल्याने त्याच्या वेळेत छायांकित प्रत काढणे आवश्यक असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे यंत्र हवे. विद्यापीठाने आगामी उन्हाळी परीक्षेच्या आधी विद्यापीठाने संपूर्ण यंत्रसामग्री न दिल्यास सर्व मिळून परीक्षेवरच बहिष्कार टाकू, असा इशाराही डॉ. भोयर यांनी दिला. या चर्चेदरम्यान प्राचार्य डाॅ. धनवटे, डाॅ. अजित जाचक आदींनी सहभाग घेतला. यावेळी कुलगुरूंनी दिड महिन्याच्या आत महाविद्यालयांना सर्व यंत्र पाठवण्याचे आश्वासन दिले. तसेच परीक्षेचा खर्च खूप वाढला असून येणाऱ्या काढात परीक्षा शुल्कात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत दिले. त्यात किती वाढ करायची हा निर्णय पुढे घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>> नागपुरात टोळीयुद्ध पेटले, अंधाधुंद गोळीबारात कुख्यात गुंडाची हत्त्या
विद्यापीठाच्या महसूल वाढीसाठी समिती विद्यापीठाचा वार्षिक महसूल मागील काही वर्षांमध्ये कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे शुल्क वाढ होण्याचा धोका संभवतो आहे. त्यामुळे विद्यापीठ, विद्यार्थी व सर्वांच्या हिताचा विचार करता महसूल कसा वाढवता येईल, यावर विचार होणे आणि उपाय शोधणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी मांडला. यावर सर्वांनी अनुमती दिली असून डॉ. राजेश भोयर यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. ही समिती एका महिन्याच्या आत विद्यापीठाला आपला अहवाल देणार आहे. समितीने महसूल वाढीसह खर्चात कशी कपात करता येईल यावर सूचना द्याव्या अशी विनंती कुलगुरूंनी केली.