नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. मात्र, बी.कॉम. पदवीच्या परीक्षेदरम्यान सनदी लेखापाल(सीए) पदाची परीक्षा मे महिन्यात एकाच तारखांना होणार असल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठाने आता बी.कॉम. दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्राच्या ८ आणि ९ मेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बी.कॉम. अभ्यासक्रमाला प्रवेशित असणारे बहुतांश विद्यार्थी हे सनदी लेखापाल पदाची तयारी करत असतात. अनेक विद्यार्थी बी.कॉम. प्रथम वर्षापासून सनदी लेखापाल पदाच्या पात्रता परीक्षा देतात. मात्र, यंदा नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. आणि सनदी लेखापाल पदाच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांसमोर चिंता वाढली आहे. विद्यापीठाने वेळापत्रकात बदल न केल्यास कुठल्यातरी एका परीक्षेला मुकण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये होती. विद्यापीठाच्या बी.कॉम.च्या परीक्षा ८ ते २७ मे दरम्यान आहेत. यामध्ये द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचव्या सत्राच्या परीक्षांचा समावेश आहे. तर सनदी लेखापाल पदाची परीक्षा ५ ते १६ मे दरम्यान होणार आहे. सनदी लेखापाल पदाच्या परीक्षाही विविध सत्रांत विविध तारखांना होणार आहेत. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. त्यामुळे विद्यापीठाने वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी केली जात होती.

हेही वाचा…नागपूर : आयटी पार्क मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची मुजोरी, पोलीस माघारी फिरताच…

नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य राहुल हनवते यांनीही हा प्रश्न उपस्थित करून विद्यापीठाकडे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. लोकसत्तानेही या विषयाला वाचा फोडली होती. यानंतर आता विद्यापीठाने ८ ते ९ मे दरम्यान होणाऱ्या बी.कॉम. दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्राच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university postpones bcom exams to accommodate chartered accountant exam clash dag 87 psg