नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला फार गंभीर प्रसंगांमधून सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे नुकतेच निधन झाले. कुलगुरूंच्या निधनानंतर विद्यापीठातील प्र- कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असतो. कुलगुरू चौधरी यांचे दोनदा निलंबन झाले आहे. मात्र निलंबनानंतरही विद्यापीठातील प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचे पद शाबूत होते. मात्र कुलगुरूंच्या निधनामुळे त्यांना आता आपले पद सोडावे लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी तसे पत्र काढून त्यांना पद सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी रात्री तसे पत्र विद्यापीठाला देण्यात आले. विद्यापीठ शिक्षण मंचासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विद्यापीठातील कुठल्याही मोठ्या पदावर आता त्यांच्या गटातील अधिकारी नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कायदा काय सांगतो

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १३, उपकलम ७ नुसार प्र-कुलगुरूंच्या पदाचा कालावधी हा कुलगुरूंच्या पदाच्या अवधीबरोबरच संपतो. त्यामुळे कायद्याचे तंतोतंत पालन करून प्र-कुलगुरूंचा कार्यकाळ संपुष्टात आल्याचे परिपत्रक जाहीर करावे, अशी मागणी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी प्रभारी कुलगुरूंकडे केली होती. तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीनंतर कायद्याचे कलम ६ नुसार कुलपतींनी कुलगुरूंशी विचारविनिमय करून विद्यापीठासाठी प्र-कुलगुरू म्हणून डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १३ उपकलम ७ नुसार प्र-कुलगुरूंचा पदावधी (कार्यकाळ) कुलगुरूंच्या पदाच्या अवधीबरोबरच किंवा वयाची ६५वर्षे पूर्ण करेपर्यंत जे लवकर घडेल तेव्हा समाप्त होतो. दिवंगत कुलगुरू डॉ. चौधरी यांचे २६ सप्टेंबरला निधन झाले. त्याच दिवशी प्र-कुलगुरू म्हणून कार्यकाळ नैसर्गिकपणे संपला. त्यामुळे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. दुधे २६ सप्टेंबरनंतर कायद्याप्रमाणे एकदिवसही पदावर राहू शकत नाही. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपल्याचे पत्र काढावे, अशी मागणी ॲड. वाजपेयी यांनी केली होती.

हेही वाचा : चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वादग्रस्त निवड

माजी कुलगुरू डॉ. काणे यांनी कुलसचिव पदासाठी ज्यांना गुणवत्तेच्या निकषावर अपात्र ठरवले त्या डॉ. संजय दुधे यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर ऑक्टोबर २०२० मध्ये नियुक्ती झाली होती. विद्यापीठ वर्तुळातील अनेक दिग्गजांना डावलून डॉ. दुधेंची निवड झाल्याने गुणवत्ता, पात्रता या निकषांऐवजी विशिष्ट विचारांची बांधीलकी व शिक्षण मंचाची निष्ठा सरस ठरल्याची चर्चा होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university pro vice chancellor dr sanjay dudhe have to leave his post dag 87 css