नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर तब्बल एकवीस महिन्यांच्या सक्तीच्या रजेनंतर मंगळवारी मूळ पदावर रुजू झाले आहेत. डॉ. धवनकर यांची चौकशी सुरू राहणार असून चौकशी समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांची सक्तीची रजा तूर्तास रद्द करण्यात आली आहे.
लैंगिक छळाची भीती
लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले होते. डॉ. धवनकर प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांच्या समितीने आपला अहवाल दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला होता. प्राथमिक चौकशी समितीने धवनकर यांची विभागीय चौकशी करावी, अशी शिफारसही केली. त्यामुळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश समीर दास यांच्या समितीने धवनकर प्रकरणाची चौकशी केली. मात्र, ज्या चार प्राध्यापकांची फसवणूक होऊन त्यांनी पैसे दिल्याची तक्रार केली होती त्यांनीच दोन्ही पक्षांमध्ये सहमतीने माघार घेत असल्याचे कबूल केले. असेच आता कुठलेही आर्थिक देणे-घेणे नाही असेही लिहून दिले. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले होते. एकवीस महिन्यांपासून या प्रकरणावर ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर विद्यापीठाने धवनकर यांची सक्तिची रजा संपुष्टात आणत चौकशी समितीच्या अधीन राहून पदावर रूजू होण्याचे आदेश दिले. मंगळवारी धवनकर जनसंवाद विभागात पदभार स्वीकारल्याची माहिती आहे.
हेही वाचा : सावधान! चिकनगुनियाच्या रुग्णांवर स्टेराॅईडचा प्रयोग! अस्थिरोग तज्ज्ञ म्हणतात…
तीन गंभीर प्रकरणातून धवनकरांची सुटका!
डॉ. धवनकर यांच्यावर पाकिस्तान येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन जाण्याच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. यावेळी त्यांना काही काळासाठी निलंबित केले होते. मात्र, गंभीर कारवाई झाली नाही. त्यानंतर पाच वर्षांआधी दिल्ली येथे शैक्षणिक सहल घेऊन जाण्याच्या प्रकरणातही आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार झाली होती. मात्र, यावेळी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यानंतर आता सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणुकीची तक्रार करूनही कुठलीही ठोस कारवाई न होता २१ महिन्यांनी डॉ. धवनकर अखेर पदावर रूजू झाले. तरीही त्यांची चौकशी सुरू राहणार आहे, हे विशेष.