परीक्षाविषयक कामातील त्रुटी; विधिसभेत मुद्दा गाजला, कारवाईचे आश्वासन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेशी संबंधित कामे करणाऱ्या ‘प्रोमार्क’ या खासगी कंपनींच्या चुकांचा आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या विधिसभेत घेण्यात आला.

मनमोहन वाजपेयी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठाच्या परीक्षेविषयक कामांसाठी इंटर इन्स्टिटय़ूशनल कॉम्प्युटर सेंटर (आयआयसीसी) बरोबर ‘प्रोमार्क’ची मदत घेतली जाते. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट देण्यापासून ते विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यापर्यंतची कामे ही कंपनी करते. तसा करारच विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात  झालेला आहे. त्यासाठी विद्यापीठ कोटय़वधी रुपये कंपनीला देत असते. मात्र, पाहिजे तसे काम या कंपनीकडून होत नाही. त्यामुळे  या कंपनीची सेवा का घेतली जाते? परीक्षेविषयक कामे देण्यासाठी निविदा का काढल्या जात नाहीत? असे प्रश्न वाजपेयी यांनी उपस्थित केले.

प्रोमार्कच्या चुकांचा फटका  विद्यार्थ्यांना बसतो. विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर न लागणे, विद्यार्थ्यांचे एकच प्रवर्ग (लिंग) दर्शवणे, विद्यार्थी उत्तीर्ण असताना त्यांना अनुत्तीर्ण दाखवणे, परीक्षेला बसले नसतानाही त्यांना उत्तीर्ण दाखवणे अशा असंख्य चुका प्रोमार्ककडून होत असताना विद्यापीठ त्यावर कोणतीच कारवाई न करता उलट त्यांचा कार्यकाळ वाढवून देते, याबद्दल सदस्यांनी आक्षेप नोंदवला. एवढय़ा चुका होऊनही  विद्यापीठ साधी ताकीदही कंपनीला देत नसल्याची बाब डॉ. बबन तायवाडे यांनी लक्षात आणून दिली, तर याच विषयावर विष्णू चांगदे यांनी प्रोमार्क कडून राबवले जाणारे परीक्षा भवनातील विद्यार्थी सुविधा केंद्र कूचकामी असून तेथे कोणतीही माहिती मिळत नसल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. संतप्त सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन विधिसभा अध्यक्ष डॉ. काणे यांनी चुका आढळल्यास प्रोमार्कला ताकीद देऊन चौकशी करण्यात येईल. तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.

सदस्यांना ‘अपात्र’ ठरवण्याचा इशारा

विधिसभेत विविध विषयांवरील चर्चेदरम्यान कुलगुरूंकडून कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. डॉ. आर.जी. भोयर, डॉ. मृत्युंजय सिंग, डॉ. केशव मेंढे, अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी, प्रवीण उदापुरे यांनी  सभागृहात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तेव्हा अडचणीत येणाऱ्या प्रश्नांवर कुलगुरूंनी अपात्र करण्याच्या धमक्या दिल्या.

गणपूर्तीच्या मुद्यावर दीर्घ चर्चा

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बुधवारी झालेल्या विधिसभेच्या बैठकीत गणपूर्तीच्या सदस्य

* संख्येवर दोन तास काथ्याकूट होऊन सरतेशेवटी विधिसभा अध्यक्षांनी लोकशाही पद्धतीने विधिसभेचे कामकाज चालावे हे सदस्यांचे म्हणणे मान्य केले. बैठक सुरू झाल्यावर सदस्यांनी आवश्यक सदस्य संख्या नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभा दुसऱ्यांदा सुरू झाल्यानंतर आता सदस्यसंख्येची गरज नाही, अशी भूमिका विधिसभा अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ काणे यांनी घेतली. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचे कलम ६९(३) चा वारंवार हवाला देऊन त्यांनी सदस्य संख्येची गरज नसल्याचे म्हटले. मात्र, ज्येष्ठ सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी विद्यापीठ अस्तित्वात आल्यापासून तयार करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे दाखले देऊन विद्यापीठाच्या सिनेटसाठी कमीत कमी एक तृतीयांश सदस्य संख्या आवश्यक असल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university review error of promarc private company