नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन होताच त्यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश पसरवून डॉ. चौधरींनी केलेल्या कामाचे गोडवे गायिले जात आहे. साडेतीन वर्षांत दर्जेदार कामगिरी करणारे कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याबाबत काही लोक खोटी माहिती देऊन नाहक बदनामी करत असल्याचा आरोप होत आहे. काहींकडून निलंबनाला जातीय रंगही दिला जात आहे. त्यामुळे निलंबनानंतर विद्यापीठ वर्तुळात समाज माध्यमांवर अशा चर्चा रंगल्या आहेत.
एका माजी अधिसभा सदस्याने डॉ. चौधरींच्या समर्थनार्थ माहिती लिहून ती सर्वत्र पाठवली. यानुसार, काही लोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची चांगली प्रतिमा खराब करून बदनामी करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. डॉ. चौधरी यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये, संस्था, त्यांच्या विद्याशाखांचा विकास केला. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कार्ये आणि कर्तव्ये पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस आणि ७२ वी इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे यशस्वी आयोजन केले. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे विद्यापीठाने ‘अ’ दर्जा कायम राखला.
हेही वाचा…ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा पंतप्रधान मोदींकडून गौरवपूर्ण उल्लेख
पदव्युत्तर विभागांना स्वायत्तता मिळवून दिली. शताब्दी वर्षासाठी निधी उभा केला. चौधरींच्या पुढाकाराने नागपूर विद्यापीठाला भरघोस अनुदान मिळाले. रोजगार कक्षाच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत आहे. असे असतानाही त्यांची नकारात्मक बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. यावर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या सदस्यांकडून याला उत्तर देण्यात आले. चूक केली नसेल तर भीती कसली. चौकशी समितीमधून सत्य काय ते बाहेर येईल?, मात्र, असे जातीय रंग देऊन प्रतिमा सुधार करू नये असे आवाहन करण्यात आले.
नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निलंबनामुळे शताब्दी वर्षात नागपूर व शिक्षणक्षेत्राचे अत्यंत नुकसान झाले आहे. विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. मात्र कुलगुरुंच्या निलंबनानंतर विद्यापीठातील काही उच्चपदस्थ मंडळी कुलपतींच्या या निर्णयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक प्राध्यापक व अधिकारी फोन करून तशी माहिती देत आहेत. तशा आशयाची माहिती समाज माध्यमांवर पसरवून दबाव आणला जात आहे. कुलपती यांचा निलंबनाचा आदेश योग्य की अयोग्य हे चौकशीअंती कळलेच. परंतु, जातीय रंग देऊन कायदेशीर प्रक्रियेवर दबाव आणता येईल असे वाटत असेल तर अपरिपक्वता आहे. – विष्णू चांगले, अधिसभा सदस्य, नागपूर विद्यापीठ.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी निर्माणाधीन मंडप कोसळला, चार जण जखमी
उच्च न्यायालयाने अनेक निर्णयात विद्यापीठ प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. आम्ही ठोस पुराव्यांच्या आधारेच आतापर्यंत चौधरींच्या विरोधात तक्रार केली आहे. शेवटी सत्याचा विजय होणार आहे. -ॲड. मनमोहन वाजपेयी, अधिसभा सदस्य, नागपूर विद्यापीठ