नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दहा पदवीधर जागांसाठी ११ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुका आता १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून बुधवारी अधिकृत घोषणा होईल, असे सांगितले जात आहे. तयारी पूर्ण न झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेवर आधीपासून टीका होत आहे. विद्यापीठाने अधिसभेच्या दहा पदवीधर जागांसाठी सुरुवातीला ३० नोव्हेंबरला निवडणूक जाहीर केली होती. मात्र, रविवारी निवडणूक घेण्याची मागणी असल्याचे कारण समोर करून ही निवडणूक पुढे ढकलून ११ डिसेंबरला जाहीर केली. परंतु निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये चुका असल्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माजी अधिसभा सदस्य प्राध्यापक प्रशांत डेकाटे यांनी दाखल केली.
हेही वाचा: नागपूर: सांताक्लॉज पावला, पुणे, मुंबईकरिता आता….
याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ७ डिसेंबरला सुनावणी ठेवली. त्यामुळे विद्यापीठाला आयते कोलित मिळाले असून याचा फायदा घेत प्रशासनाने निवडणुकीची कुठलीही तयारी केली नाही. मतपत्रिकांची छपाई अद्याप झाली नसून मतदान केंद्रांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निवडणुका जानेवारीमध्ये होणार असल्याचे कळते.
हेही वाचा: नागपूर: निवडणूक जिंकले आणि चक्क विद्यापीठाच्या इमारतीतच….
१९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था पाहता डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार नाहीत. त्यानंतर ३ ते ७ जानेवारीपर्यंत होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद विद्यापीठाकडे आहे. यामुळे या दरम्यानही निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर १८ ला मतमोजणी होणार आहे.