राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांना लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ शिक्षण मंचाने प्रगती पुस्तकाचे प्रकाशन आणि कोजागिरी उत्सवाचे आयोजन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक उपस्थित हाेते.
मागील काही वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांमध्ये शिक्षण मंचाचा वरचष्मा राहिला आहे. विद्यापीठातील विधिसभेच्या निवडणुकाही लवकरच होणार आहेत. या दिशेने मंचाने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. यासाठी निवडणूक प्रचार कार्यालय आणि मंचाच्या प्रगती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे, आमदार रामदास आंबटकर, प्रांत संघटन मंत्री विवेक जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभू देशपांडे, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आर. जी. भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तळा -गाळातील व शेवटच्या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा यासाठी विद्यापीठ शिक्षण मंच कटिबद्ध आहे, असे आश्वासन डाॅ. कल्पना पांडे यांनी दिले. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये शंभर टक्के विजय मिळवणार असा विश्वासही व्यक्त केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याच विषयावर मतभिन्नता असते, पण संघटनेच्या विकासासाठी व प्रगतीकरिता आपली नाराजी सार्वजनिक ठिकाणी व्यक्त न करता योग्य त्या मार्गाने चर्चा करून त्यावर तोडगा काढता येतो, असेही पांडे यांनी सांगितले.
हेही वाचा : नागपूर: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच; कर्जमाफीसाठी पात्र, पण लाभ नाही
कार्यक्रमाचे संयोजक व नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे महामंत्री डॉ. सतीश चाफले यांनी विद्यापीठ नागपूर शिक्षण मंचाच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या स्थान निश्चितीच्या प्रश्न, अंशकालीन प्राध्यापकांचा वेतनाचा तिढा, समाजकार्य महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या अडचणींचा निपटारा करण्यात निरंतर आंदोलनातून शिक्षण मंच आपली भूमिका नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे सांगितले. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी तर आभार डॉ. मारोती वाघ यांनी मानले.