नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा यंदा १७ मार्चपासून सुरू होणार आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा वेळेत सुरू होणार असून सर्व परीक्षा ३१ मेपर्यंत संपवून सर्व परीक्षांचे निकाल हे ३० जूनपर्यंत जाहीर करण्याचा निर्धार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल वेळेत मिळण्याची अपेक्षा आहे.

नागपूर विद्यापीठाच्या जवळपास बाराशे उन्हाळी परीक्षा असतात. पहिल्या टप्प्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतात. परंतु, यंदा परीक्षेच्या नियोजनात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यापीठामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या ही बी.ए., बी.एसस्सी., बी.कॉम, बी.सी.ए. बी.बी.ए. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची असते. परंतु, या विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशीरा झाल्यास त्यांना निकालासाठी अडचण होते. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षा लवकर घेण्यावर विद्यापीठाचा भर आहे. विशेष म्हणजे, बी.ए., बी.एसस्सी., बी.कॉम, बी.सी.ए. बी.बी.ए. या सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो. त्यासाठी विद्यापीठाचे नियोजन सुरू असून काही दिवसांतच सर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. करोनानंतर विद्यापीठाच्या परीक्षांची घडी बिघडली होती. अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेशही उशीरा सुरू होत होते. परंतु, अलिकडे प्रवेश वेळेत होत असल्याने परीक्षा वेळेत सुरू करण्यावर विद्यापीठाचा भर आहे.

निकाल ४५ दिवसांच्या आत

नुकतीच कुलपती व राज्यपालांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची आढावा बैठक घेतली. यावेळी निकालासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी ४५ दिवसांच्या आत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होणे आवश्यक असल्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या होत्या. त्यामुळे यंदा विद्यापीठानेही सर्व परीक्षा व त्यांचे निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व उन्हाळी परीक्षांचे निकाल हे ३० जूनपर्यंत जाहीर होतील या पद्धतीने विद्यापीठाने नियोजन केले आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या १७ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यावरही विचार सुरू आहे. यामुळे त्यांची परीक्षा व निकालाला गती देता येईल. सोबतच सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या दिशेने नियोजन सुरू आहे.

डॉ. संजय कविश्वर, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

Story img Loader